न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टीन गप्टीलने आपल्याच देशाचा माजी खेळाडू ब्रेंडन मॅक्यूलमचा विक्रम मोडीत काढला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मार्टीन गप्टील सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत गप्टीलने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कॉलिन मुनरोसोबत डावाची सुरुवात करताना गप्टीलने आपल्या संघाला १०.२ षटकांमध्ये १३२ धावांपर्यंत मजर मारुन दिली. याचसोबत गप्टीलने टी-२० कारकिर्दीतलं आपलं दुसरं शतकही या सामन्यात पूर्ण केलं.

गप्टीलआधी हा विक्रम न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रँडन मॅक्युलमच्या नावे जमा होता. मॅक्यूलमच्या नावावर २१४० धावा जमा आहेत. मार्टीन गप्टीलने या सामन्यात आपल्या माजी साथीदाऱ्याला मागे टाकत २१४५ धावांपर्यंत मजल मारली आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज –

१) मार्टीन गप्टील – न्यूझीलंड – २१४५ धावा – (७३ टी-२० सामने)
२) ब्रेंडन मॅक्युलम – न्यूझीलंड – २१४० धावा – (७१ टी-२० सामने)
३) विराट कोहली – भारत – १९५६ धावा – (५५ टी-२० सामने)
४) तिलकरत्ने दिलशान – श्रीलंका – १८८९ धावा (८० टी-२० सामने)
५) शोएब मलिक – पाकिस्तान – १८२१ धावा (९२ टी-२० सामने)