Mary Kom Opens Up on Her Divorce: भारताची चॅम्पियन बॉक्सर म्हणून ओळख असलेल्या मेरी कॉमने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जगभरात भारताचं नाव गाजवलं. सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन व ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती असलेल्या मेरी कॉमची कहाणी आपण रूपेरी पडद्यावर पाहिली आहे. मेरी कॉमचा संघर्ष, तिची कारकीर्द व तिचं यश याच्याबरोबरच तिची लव्हस्टोरी देखील आपण पाहिली. पण लग्नाच्या अनेक वर्षांनंतर तिने घटस्फोट घेतल्याने सर्वच जण चकित झाले. या घटस्फोटाबद्दल तिने खुलासा केला आहे.

मेरी कॉमने तिच्या आयुष्यातील या सर्वात कठीण प्रसंगाबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. घटस्फोट, आर्थिक अडचणी आणि सातत्याने होत असलेली टीका या सगळ्यांचा तिला सामना करावा लागला. या सर्व प्रकरणांदरम्यान तिने पाळलेलं मौन चुकीच्या अर्थाने घेतलं जात असल्यानेच आपल्याला बोलावं लागलं, असं मेरी कॉमने स्पष्ट केलं.

मेरी कॉम म्हणाली २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांपूर्वी झालेल्या दुखापतीनंतर हा संकटांचा काळ सुरू झाला. काही महिने ती अंथरुणाला खिळलेली होते आणि नंतर तिला चालण्यासाठी वॉकरचा आधार घ्यावा लागला. या काळात तिला आतापर्यंत दुर्लक्षित केलेल्या अनेक वास्तवांचा सामना करावा लागला.

मेरी कॉमचा घटस्फोट का झाला? नेमकं काय घडलं?

“मी स्पर्धांमध्ये खेळत असताना सगळं ठीक होतं आणि आर्थिक बाबींमध्ये माझा फारसा सहभाग नव्हता. मात्र २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांपूर्वी दुखापत झाल्यानंतर मला जाणवलं की मी एका खोट्या वास्तवात जगत होते,” असं मेरी कॉमने स्पष्टपणे सांगितलं. तिच्या दुखापतीच्या कठीण काळातच पती करुंग ओन्खोलर याच्यावरील विश्वास उडाल्याचं मेरी कॉमने सांगितलं. दोन दशकांहून अधिक काळ ते दोघेही एकत्र होते. मात्र दोन वर्षांहून अधिक काळापूर्वी दोघे वेगळे झाले आणि २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

“माझं वैयक्तिक आयुष्य जगासाठी चर्चेचा विषय व्हावं, असं मला कधीच वाटलं नाही. त्यामुळे आम्हा दोघांमध्ये अनेकदा तोडगा काढण्याचा प्रयत्न करूनही यश न आल्याने मी घटस्फोटाचा मार्ग स्वीकारला,” असं मेरी कॉमने स्पष्ट केलं. तिने सांगितलं की, दोन्ही कुटुंबांना या निर्णयाची माहिती देण्यात आली होती आणि त्यांनी तो समजूनही घेतला. मात्र तिच्या खासगी आयुष्यासंबंधित गोष्टी बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर येऊ लागल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली.

मेरी कोमच्या नवऱ्यानेच केली तिची फसवणूक?

“माझ्या आयुष्यातून मी काय काय सहन केलं आहे, याची कल्पनाही नसताना काही लोकांनी मला लोभी ठरवलं,” अशी खंत मेरी कॉमने व्यक्त केली. मेरी कॉमने आरोप केला की, तिची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, स्वतःच्या कमाईतून खरेदी केलेल्या जमिनीचा ताबाही तिला गमवावा लागला. मणिपूरमधील तिच्या मालमत्ता आणि जमिनीवर कर्ज काढण्यात आलं आणि कर्जवसुलीसाठी स्थानिक गटांनी त्या ताब्यात घेतल्याचाही दावा तिने केला आहे. मात्र, तिचे पती करुंग ओन्खोलर यांनी सर्व आरोप फेटाळल्याचं रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे सार्वजनिकरित्या आपल्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं, असं मेरी कॉमने सांगितलं. “मी जे काही साध्य केलं, त्याचा अर्थ तरी काय? मी आतून पूर्णपणे तुटून गेली आहे, पण शोक व्यक्त करण्याचीसुद्धा मला मुभा नाही,” अशा शब्दांत तिने आपली वेदना व्यक्त केली.

“मी माझ्या मुलांसाठी कठोर परिश्रम करते. हे सगळं किती कठीण होतं, हे देवच जाणतो. पण जेव्हा तुमच्यावर मुलांची जबाबदारी असते, तेव्हा तुम्ही खचून बसू शकता का?” असा सवालही तिने उपस्थित केला. मेरी कॉमने स्पष्ट केलं की, तिला कोणतीही पोलिस कारवाई करायची नाही; फक्त तिच्याबाबत होणारी खोटी चर्चा पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबाव्यात, एवढीच तिची इच्छा आहे. “पण मी लढणं थांबवणार नाही. माझं आयुष्य जणू एक अखंड बॉक्सिंग सामना बनलं आहे,” अशा शब्दांत मेरी कॉमने तिच्या संघर्षाचं वर्णन केलं.