भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने २०२० साली टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना मेरी कोमने याबद्दलचे संकेत दिले आहेत. आपल्या अखेरच्या स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा मेरी कोमचा मानस आहे. मेरी कोमच्या नावावर सहा विश्वविजेतेपदं जमा आहेत.

“एखादा खेळाडू आपल्या कारकिर्दीत सलग इतकी वर्ष खेळत नाही. कित्येक पुरुष बॉक्सर २०-२५ वर्षांची कारकिर्द झाली की निवृत्ती स्विकारतात. मात्र मी अजुनही खेळते आहे. ज्या स्पर्धेत मी उतरते त्या स्पर्धेत मी देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्येही देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.” मेरी कोम पत्रकारांशी बोलत होती.

३ ऑक्टोबरपासून रशियामध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मेरी कोम या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत मेरी कोम विजेतेपद मिळवते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.