नवी दिल्ली : आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला बॉक्सिंगमध्ये चांगली पदके मिळतील, मात्र सुवर्णपदकाचा क्षण अनुभवायला मिळणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया भारताची माजी जगज्जेती बॉक्सर मेरी कोम हिने व्यक्त केली आहे.
‘‘भारतीय खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे. त्यांची तयारी देखील चांगली झाली आहे. आपल्याला पदके निश्चित मिळतील. पण, सुवर्णपदकाची खात्री नाही. अंतिम फेरी गाठली तरी खूप झाले. राष्ट्रकुल स्पर्धेत आव्हान इतके कठीण असताना त्यानंतर होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्यासमोर यापेक्षा कठीण आव्हानाचा डोंगर असेल,’’ असे मेरी कोम म्हणाली.
अखेरच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण आणि एका रौप्य पदकासह एकूण सात पदके जिंकली होती. आता २३ जुलैपासून ग्लासगो येथे सुरू होणार्या आगामी स्पर्धेसाठी भारताचे सात पुरुष आणि सात महिला बॉक्सरचे पथक सज्ज झाले आहे. यावेळी महिला संघाकडून अधिक अपेक्षा आहेत, ज्यामध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लवलिना बोरगोहेन (७५ किलो), जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली जॅस्मिन लम्बोरिया (५७ किलो), आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती प्रीती पवार (५४ किलो) आणि विश्वचषक सुवर्णपदक विजेती अरुंधती चौधरी (७० किलो) यांचा समावेश आहे. या चौघींनीही एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकली आहेत. पुरुषांमध्ये आशियाई अजिक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा सचिन सिवाच (६० किलो) आणि कांस्यपदक विजेता नरेंद्र बेरवाल (९० किलोपेक्षा अधिक) यांच्याकडून मोठ्या आशा आहेत.
भारतीय बॉक्सिंगपटू साहित्याशिवाय दाखल
भारतीय बॉक्सिंग संघासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवातच गैरसोयीची ठरली आहे. स्पर्धेसाठी ग्लासगोला येत असताना भारतीय बॉक्सिंग संघाचे अर्धे स्पर्धा साहित्य बेलफास्टमध्येच मागे राहिले. बेलफास्ट येथे तयारीसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरानंतर २२ सदस्यांचा भारतीय बॉक्सिंग संघ ग्लासगोला पोहोचला. मात्र, साक्षी चौधरी (५१ किलो), जागतिक विजेती जास्मिन लम्बोरिया (५७ किलो), परवीन हुडा (६५ किलो), जादुमणी सिंग (५५ किलो), कपिल पोखरिया (९० किलो) आणि पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक सी. कुट्टप्पा यांच्यासह इतरांचे सामान त्यांच्यासोबत येऊ शकले नाही.
