Mashrafe Murtaza against FIR filed : बांगलादेशात नुकत्याच झालेल्या आंदोलन, दंगली आणि सत्ताबदलानंतर तेथील चित्र पूर्णपणे बदलले आहे. या आंदोलना दरम्यान क्रिकेटर शकीब अल हसनवर हत्येचा आरोप आहे. आता या यादीत शकीबसोबत बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशरफे मुर्तझा याचेही नाव जोडले गेले आहे. काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी ढाका येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी मुर्तझाविरुद्ध नरिल सरदार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर मुर्तझाच्या वडिलांविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.
शेख मुस्तफा नावाच्या व्यक्तीने १० सप्टेंबर रोजी हा एफआयआर दाखल केला होता. विद्यार्थ्यांवर हल्ले करून देशात अशांतता पसरवणाऱ्या मशरफी मुर्तझा आणि त्याच्या वडिलांसह एकूण ९० जणांची नावे त्यांनी पुढे केली आहेत. यापूर्वी, शकीब अल हसनवर खुनाचा आरोप असताना, पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर तो आपल्या देशात परतला नाही तर काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता.
मशरफे मुर्तझाविरुद्ध का गुन्हा दाखल –
मशरफे मुर्तझाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत हे निवेदन जारी करण्यात आले आहे की, रविवार ४ ऑगस्ट रोजी झालेल्या आरक्षण आंदोलनादरम्यान नरेल येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर गोळीबार आणि बॉम्बस्फोट झाले होते. या हल्ला करणाऱ्यांमध्ये मशरफे मुर्तझा आणि त्याच्या वडिलांसह अनेकांचा समावेश असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, सरकार उलथून टाकले आहे, ज्यामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि भारतात आश्रय घ्यावा लागला. काही दिवसांनंतर, निदर्शनांदरम्यान मशरफेच्या घराला आग लावल्याची बातमी आली होती. ज्यानंतर घरातील आगीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हेही वाचा – शुबमन गिल ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? इन्स्टा स्टोरी व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण, कोण आहे जाणून घ्या?
विशेष म्हणजे मशरफे मुर्तझा लवकरच क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. तो लवकरच यूएस टी-१० लीगमध्ये डेट्रॉईट फाल्कन्सकडून खेळताना दिसणार आहे. भारताच्या सुरेश रैना, मुनाफ पटेल आणि पार्थिव पटेलपासून ते पाकिस्तानी दिग्गज मोहम्मद हाफिज आणि मिसबाह-उल-हकही या लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत.