एकदिवसीय आणि टी-२० मालिकेनंतर भारतीय संघासमोर आता कसोटी मालिकेच खरं आव्हान आहे. १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली फक्त पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याने भारतासमोर अनेक आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने पितृत्व रजा घेतली असून पहिल्या सामन्यानंतर तो पुन्हा भारतात परतणार आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या सामन्यानंतर कोहलीची अनुपस्थिती, इशांत शर्मा गोलंदाजीसाठी नसणे, नटराजनला कसोटी संघात संधी देणे आणि विशेष म्हणजे रोहितने ऑस्ट्रेलियात जावं का अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

भारतीय संघाला विराट कोहलीची अनुपस्थिती भासणार असल्याचं सचिन तेंडुलकरनेही मान्य केलं आहे. मात्र यावेळी त्याने संघ सध्या चांगली कामगिरी करत असून कोहलीच्या अनुपस्थित नवीन चेहऱ्याला संधी मिळेल याकडेही लक्ष वेधलं.

“विराटसारखा अनुभवी खेळाडू जो गेल्या अनेक काळापासून भारतीय संघात आहे, जो ऑस्ट्रेलियात आधीही खेळला आहे त्याची कमतरता नक्कीच भासणार आहे. पण हे संघाबद्दल आहे, कोणी एका व्यक्तीबद्दल नाही. तशी माझी इच्छा नाही पण विराट जखमी झाला असता तर दुसरा सामना त्याला त्याच्याशिवायच खेळावा लागला असता. मला इतकंच सांगायचं आहे की, संघातील महत्वाचा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघाने त्याच्याशिवाय पुढे जाऊन खेळायचं असतं,” असं सचिनने सांगितलं आहे.

सचिनने यावेळी जुनी आठवण सांगत म्हटलं की, “मला वेस्ट इंडिजविरोधातील कसोटी सामना आठवतो जेव्हा अनिल कुंबळे जखमी झाला होता आणि त्यानंतर आम्ही त्याच्याशिवाय खेळलो होतो. त्यावेळी अनिल आमचा मुख्य गोलंदाज होता. त्यामुळे अशी आव्हानं येत असतता, आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे”.

“आपल्या संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. एखाद्या नव्या खेळाडूकडे मैदानात जाऊन देशासाठी काही तरी कऱण्याची संधी चालून येणार आहे. विराट तिथे असता तर संधी मिळाली नसती,” असंही सचिनने म्हटलं आहे.

रोहित असता तर फायदा झाला असता का असं विचारण्यात आलं असता सचिनने सांगितलं की, “मला रोहितच्या फिटनेसबद्दल कल्पना नाही. हे बीसीसीआय आणि रोहितला माहिती आहे. ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. बीसीसीआय, फिजिओ आणि टीम मॅनेजमेंटच याचं उत्तर देऊ शकतं. जर रोहितने फिटनेस टेस्ट पूर्ण केली तर त्याच्यासारखा खेळाडू ऑस्ट्रेलियात असायला हवा. जर तो सर्व टप्प्यांवर उत्तीर्ण असेल तर तो ऑस्ट्रेलियात असला पाहिजे”.