पीटीआय,
जकार्ता भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी गुरुवारी आपापल्या सामन्यांत सरळ गेममध्ये विजय मिळवून इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ५०० दर्जा) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी किदम्बी श्रीकांत आणि अनमोल खरब यांचे आव्हान मात्र दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले.
पुरुष एकेरीच्या लढतीत लक्ष्यने हाँगकाँग चीनच्या जेसन गुनावनवर २१-१०, २१-११ असा सहज विजय मिळवला. जागतिक स्पर्धेतील माजी पदकविजेत्या श्रीकांतला चोऊ टिएन चेनकडून ११-२१, १०-२१ अशी हार पत्करावी लागली. चेनच्या अचूकतेसमोर श्रीकांतचा निभाव लागू शकला नाही.
महिलांमध्ये दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने ४३ मिनिटे चाललेल्या लढतीत डेन्मार्कच्या लाइन होयमार्क कयेर्सफेल्डवर २१-१९, २१-१८ अशी मात केली. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमधील डेन्मार्कच्या खेळाडूवरील हा सिंधूचा पाचवा विजय होता. पुढच्या फेरीत सिंधूसमोर अग्रमानांकित चीनच्या चेन यू फेईचे आव्हान असेल. सिंधू आणि फेई आतापर्यंत १३ वेळा आमनेसामने आल्या असून यात फेईने सात, तर सिंधूने सहा वेळा बाजी मारली आहे. मात्र, फेईविरुद्ध सिंधूने शेवटचा विजय २०१९ मध्ये मिळवला होता. त्यामुळे फेईविरुद्धची विजयाची प्रतीक्षा संपविण्याच्या उद्देशानेच सिंधू आता कोर्टवर उतरेल. महिला एकेरीतच अनमोल खरबला दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. तिला जपानच्या अनुभवी नोझोमी ओकुहारा हिने २१-१६, १४-२१, ११-२१ असे पराभूत केले. अनमोलने पहिला गेम जिंकला, पण तिला कामगिरीत सातत्याने राखता आले नाही.
