दुबई : आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल चार’ फेरीतील सलग दोन सामन्यांत पराभूत होणाऱ्या भारतीय संघापुढे गुरुवारी अफगाणिस्तानचे आव्हान असेल. दोन्ही संघांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने हा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाईल.

गतविजेत्या भारताला यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत अपेक्षित खेळ करता आलेला नाही. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध निसटता विजय मिळवल्यानंतर भारताने तुलनेने दुबळय़ा हाँगकाँगला नमवले होते. मात्र, ‘अव्वल चार’ फेरीत त्यांना पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. भारताला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तसेच क्षेत्ररक्षणातील काही चुकाही भारताला महागात पडल्या आहेत. भारताने या चुकांमधून धडा घेणे गरजेचे आहे. अफगाणिस्तानच्या संघाला पराभूत करण्यासाठी भारताला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. अफगाणिस्तानकडे आक्रमक शैलीत खेळणाऱ्या फलंदाजांची संख्या मोठी असून उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. भारताविरुद्ध धक्कादायक निकाल नोंदवण्याची त्यांच्यात क्षमता आहे.

’ वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २,

    १ हिंदूी (संबंधित एचडी वाहिन्या)

हार्दिककडून सातत्याची अपेक्षा

भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने पाकिस्तानविरुद्ध सलामीच्या लढतीत दमदार कामगिरी केली होती. गोलंदाजीत तीन गडी बाद केल्यानंतर त्याने फलंदाजीत १७ चेंडूंत नाबाद ३३ धावांचे योगदान दिले होते. परंतु ‘अव्वल चार’ फेरीत पाकिस्तानविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही आणि गोलंदाजीत त्याने केवळ एक बळी मिळवताना ४४ धावा दिल्या. मग श्रीलंकेविरुद्ध त्याची बळींची पाटी कोरी राहिली आणि फलंदाजीत तो केवळ १७ धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याने कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. भारताच्या फलंदाजीची भिस्त पुन्हा कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. या सामन्यात ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकची यष्टीरक्षक म्हणून निवड होऊ शकेल. गोलंदाजीत दीपक चहर आणि अक्षर पटेल यांना संधी देण्याचा भारतीय संघ विचार करेल.

गुरबाझ, रशीदपासून धोका

यंदाच्या स्पर्धेत अफगाणिस्तानचा युवा यष्टीरक्षक आणि सलामीवीर रहमनुल्ला गुरबाझने प्रभावित केले आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध साखळी फेरीत १८ चेंडूंत ४० धावांची, तर ‘अव्वल चार’ फेरीत ४५ चेंडूंत ८४ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला रोखण्याचे भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान असेल. मधल्या फळीत नजीबुल्ला आणि इब्राहिम झादरान यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. गोलंदाजीची मदार रशीद खान, कर्णधार मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान या फिरकीपटूंसह डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फरूकीवर असेल.