पोर्ट ऑफ स्पेन : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी सलग १२ वी एकदिवसीय मालिका जिंकण्याची किमया साधली. बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा निर्धार भारताने केला आहे. भारताने पहिला सामना तीन धावांनी  , तर दुसरा सामना दोन गडी राखून जिंकला आहे. या दोन्ही सामन्यांमधील निसटते विजय हे अखेरच्या षटकांमध्येच साकारलेले आहेत. त्यामुळे विंडीजला या सामन्यांतून धडे घेण्याची गरज आहे.

फलंदाजीत नव्या पर्यायांना संधी

भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मालिका जिंकल्यामुळे अखेरच्या सामन्यासाठी काही राखीव खेळाडूंना संधी देऊ शकतात. विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडला डावलून शुभमन गिलला संधी देण्यात आली. त्याने दोन सामन्यांत अनुक्रमे ६४ आणि ४३ धावा केल्या आहेत. त्यामुळे गिलला विश्रांतीची शक्यता कमी आहे. गायकवाड दक्षिण आफ्रिकेच्या दर्जेदार गोलंदाजीच्या माऱ्यापुढे अपयशी ठरला होता.  दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनने अर्धशतके झळकावली.

’ वेळ : सायं. ७ वा.

’ थेट प्रक्षेपण : फॅनकोड अ‍ॅप, डीडी स्पोर्ट्स

जडेजाचे पुनरागमन?

पहिल्या दोन सामन्यांत गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे खेळू न शकलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा बुधवारी खेळण्याची दाट शक्यता आहे. जडेजा परतल्यास दुसऱ्या सामन्यात ६४ धावांची सामना जिंकून देणारी खेळी साकारणारा अक्षर पटेल संघाबाहेर जाऊ शकेल. परंतु धवनने दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्याचे धोरण आखल्यास यजुर्वेद्र चहलला विश्रांती दिली जाऊ शकते. इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेत दुखापत झालेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आवेश खानच्या जागी संघात परतू शकतो. कारण याआधीच्या सामन्यात अर्शदीप (सहा षटकांत ५४ धावा) महागडा ठरला होता. आवेश व प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीच्या शैलीत साम्य आहे.

फलंदाजीत नव्या पर्यायांना संधी

भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मालिका जिंकल्यामुळे अखेरच्या सामन्यासाठी काही राखीव खेळाडूंना संधी देऊ शकतात. विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडला डावलून शुभमन गिलला संधी देण्यात आली. त्याने दोन सामन्यांत अनुक्रमे ६४ आणि ४३ धावा केल्या आहेत. त्यामुळे गिलला विश्रांतीची शक्यता कमी आहे. गायकवाड दक्षिण आफ्रिकेच्या दर्जेदार गोलंदाजीच्या माऱ्यापुढे अपयशी ठरला होता. दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यर व संजू सॅमसनने अर्धशतके नोंदवली. इशान किशनऐवजी प्राधान्याने संधी मिळालेल्या सूर्यकुमार यादवने दोन्ही सामन्यांत निराशा केली. किशन पॉवरप्लेच्या षटकांत आक्रमक फलंदाजी करण्यात पटाईत आहे. परंतु मधल्या फळीत खेळण्यासाठी सॅमसन हाच किशनपेक्षा सरस पर्याय आहे.

होप, पूरनवर मदार

विंडीजकडे क्षमताधिष्ठित खेळाडू आहेत. परंतु एकत्रित संघ म्हणून निकाल देण्यात ते अपयशी ठरत आहेत. शे होप, निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल किंवा रोमारिओ शेफर्ड यांच्या वैयक्तिक कामगिरीवर त्यांची भिस्त आहे. जेसन होल्डरच्या अनुभवाचा योग्य उपयोग करण्याची आवश्यकता आहे. भारताआधी बांगलादेशविरुद्धही विंडीजची पाटी ०-३ अशी कोरी राहिली होती. त्यामुळे एकदिवसीय पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी विंडीजचा संघ उत्सुक आहे.

संघ

भारत : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, युजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडिज : निकोलस पूरन (कर्णधार), शे होप (उपकर्णधार), शमार ब्रूक्स, ब्रँडन किंग, कायले मेयर्स, केसी कार्टी, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, कीमो पॉल, जेडन सील्स, हेडन वॉल्श, रोमारिओ शेफर्ड.