scorecardresearch

चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर ताशेरे!

‘‘बंगळूरु कसोटीत अगदी पहिल्या दिवसापासून खेळपट्टीकडून फिरकीला मदत मिळत होती

दर्जा ‘सरासरीपेक्षा कमी’; सामनाधिकारी श्रीनाथ यांचा अहवाल

दुबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीचा दर्जा ‘सरासरीपेक्षा कमी’ असल्याचे मानांकन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिले आहे.

प्रकाशझोतातील या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या श्रीलंकेला २३८ धावांनी पराभूत करत दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादले. मात्र, १२ मार्च रोजी सुरू झालेला हा सामना केवळ तीन दिवस चालला.

‘‘बंगळूरु कसोटीत अगदी पहिल्या दिवसापासून खेळपट्टीकडून फिरकीला मदत मिळत होती. त्यानंतर प्रत्येक सत्रागणिक खेळपट्टीत काहीशी सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, माझ्या मते बॅट आणि चेंडूमधील द्वंद्वच पाहायला मिळाले नाही,’’ असे बंगळूरु कसोटीचे सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी ‘आयसीसी’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

श्रीनाथ यांनी दिलेला अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) सूपूर्द करण्यात आला आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून गोलंदाजांना मदत मिळत होती. तसेच चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीवरून माती उडत असल्याचे पाहायला मिळाले. ‘आयसीसी’च्या खेळपट्टी आणि मैदानाच्या देखरेख प्रक्रियेखाली चिन्नास्वामी स्टेडियमचा एक गुण कमी करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Match refere srinath s report on china chinnaswamy pitch rated below average zws

ताज्या बातम्या