Matt Renshaw Breaks Virat Kohli Record: कसोटी क्रिकेटमध्ये टॉप ऑर्डरच्या फलंदाजासोबत फलंदाजी करणं इतकं कठीण नसतं. यासह खालच्या फळीतील फलंदाजासोबत मिळून पार्टनरशिप करणं आणि वैयक्तिक धावा करणं त्याहून कठीण असतं. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. डर्बनमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅट रेनशॉने विराट कोहलीचा जुना रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या सामन्यात फलंदाजी करताना रेनशॉने ३९७ चेंडूंचा सामना करत १९० धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २१ चौकार खेचले आणि १ षटकार खेचला. यादरम्यान फलंदाजी करताना त्याने आठव्या क्रमांकाच्या फलंदाजापासून ते अकराव्या फलंदाजासोबत फलंदाजी करताना १७४ धावा जोडल्या. या खेळीसह तो एकाच डावात खालच्या फळीतील फलंदाजासोबत मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. याआधी हा रेकॉर्ड भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीलच्या नावावर होता. २०१६ मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळताना विराटने १३५ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने खालच्या फळीतील फलंदाजासोबत मिळून १७१ धावा जोडल्या होत्या. आता रेनशॉने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

दुहेरी शतक हुकलं, पण इतिहास घडवला

या सामन्यात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. अवघ्या १२४ धावांवर संघातील ६ फलंदाज तंबूत होते. अशा स्थितीत मॅट रेनशॉने फलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. त्याने खालच्या फळीतील फलंदाजांसोबत मिळून महत्वपूर्ण पार्टनरशिप केली. १९० धावांवर पोहोचल्यानंतर दुहेरी शतक साजरं करण्यासाठी त्याला अवघ्या १० धावा करायच्या होत्या. त्यावेळी सायमन हार्मरने त्याला बाद करत माघारी धाडलं. त्यामुळे त्याचं दुहेरी शतक हुकलं. पण शेवटी फलंदाजी करताना कर्णधार पॅट कमिन्सने ४३ आणि नॅथन लायनने २७ धावांची खेळी करून रेनशॉला चांगली साथ दिली.

रेनशॉच्या या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ३९० धावांपर्यंत मजल मारली आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकाने दुसर्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत १ गडी बाद २७ धावा केल्या. एडन मार्करम १५ तर बेडिंघम १२ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही ३६३ धावांनी पिछाडीवर आहे.