पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर मॅट रेनशॉने झिम्बाब्वेविरुद्ध खणखणीत शतकी खेळी साकारत निवडसमितीला आठवण करुन दिली. वनडेतलं हे रेनशॉचं पहिलंच शतक आहे. २०१७ मध्ये रेनशॉने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावलं होतं. त्यानंतर जवळपास दहा वर्षानंतर रेनशॉने ऑस्ट्रेलियासाठी शतक झळकावलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीच्या धोरणाचा फटका रेनशॉच्या कारकिर्दीला बसला आहे. स्टीव्हन स्मिथ तसंच ग्लेन मॅक्सवेलने वनडेतून निवृत्ती स्वीकारली आहे. मार्नस लबूशेनला वनडेतून डच्चू देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला खंबीर मधल्या फळीतील फलंदाज आवश्यक आहे. चांगली कामगिरी होत नसतानाही ऑस्ट्रेलियाने असंख्य खेळाडूंना संधी दिली. मात्र रेनशॉचा विचारच झाला नाही. कसोटीत त्याला संधी मिळाल्या. मात्र त्यातही सातत्य नव्हतं.
ऑस्ट्रेलियाचा संघ झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. झिम्बाब्वेविरुद्ध ते तीन वनडे खेळणार आहेत. सलामीच्या लढतीत रेनशॉने सहकारी नियमित अंतरात बाद होत असतानाही संयमी खेळी केली. इव्हान्सच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत रेनशॉने वनडेतल्या पहिल्यावहिल्या शतकाला गवसणी घातली.
शतकानंतर फटकेबाजीवर भर देणाऱ्या न्यामहरीने बाद केलं. रेनशॉने ९४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह १०९ धावांची खेळी केली. या शतकासह रेनशॉने वनडे संघातलं स्थान पक्कं केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कूपर कॉनलीने ५१ तर मिचेल मार्शने ३६ धावांची खेळी केली.
जानेवारी २०१७ मध्ये सिडनी इथे पाकिस्तानविरुद्ध रेनशॉने १८४ धावांची मॅरेथॉन खेळी कसोटी प्रकारात साकारली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी शतक करण्यासाठी रेनशॉला जवळपास दहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आहे. रेनशॉने १५ कसोटी, ९ वनडे आणि ९ टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
