Matthew Breetzke Jump Video AUS vs SA Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३२९ धावा केल्यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पण कडवी झुंज दिली आहे. इतर सर्व फलंदाज वगळता मार्नस लबुशेन शून्यावर बाद झाला. लबुशेन बाद झाल्यानंतर मॅथ्यू ब्रिट्झकेने पिचवरून उडी मारत भन्नाट सेलिब्रेशन केलं, त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, सेलिब्रेशनची एक अशी अनोखी शैली पाहायला मिळाली, जी कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसेल. दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रिट्झकेचं हे सेलिब्रेशन पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झाला.
ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लबुशेन बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी ज्या प्रकारे जल्लोष केला, तो पाहण्यासारखा होता. विशेषतः मॅथ्यू ब्रिट्झकेने मारलेली १० फुटांची ‘साईड जंप’ अत्यंत लक्षवेधी आणि थक्क करणारी होती. ब्रिटझके बाजूने धावत आला आणि त्याने एकाच उडीत १० फूट रुंद क्रिकेट पिच ओलांडली. सोशल मीडियावर हे दृश्य व्हायरल होत आहे. दोन्ही टोकाला असलेले फलंदाज मधून अनपेक्षितपणे उडी मारून गेलेल्या ब्रिट्झकेला पाहून चकित झाले.
१८व्या षटकात सायमन हार्मरने पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केलं. यानंतर आलेल्या लबुशेनने पुढचे चार चेंडू खेळून काढले आणि अखेरच्या चेंडूवर हार्मरने त्याला झेलबाद केलं. सायमन हार्मरने ऑफ स्टम्पच्या बाहेर पडलेला चेंडू लाबुशेनने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ना पूर्णपणे फ्रंटफूटवर होता, ना बॅकफूटवर. त्यामुळे अशा स्थितीत उभा राहून त्याने चुकीचा फटका मारला. त्याने बॅट जोरात चेंडूच्या दिशेने नेली, पण चेंडू बॅटची कड घेत थेट स्लिपमध्ये गेला आणि मार्करमने झेल घेतला.
मार्नस लाबुशेन बाद होताच तो काही क्षण आपल्या जागेवरच उभा राहिला. त्याचवेळी मॅथ्यू ब्रिट्झके तिथे आला आणि पिचच्या मधल्या भागावरून जाण्याऐवजी त्यावरून त्याने तब्बल १० फूटांची उडी मारली. क्रिकेटमध्ये पिचचा मधला भाग, जिथे चेंडूचा टप्पा पडतो, ते संरक्षित क्षेत्र मानला जातं. या भागावरून चालणं किंवा त्याचं नुकसान होईल असे वर्तन करणं खेळाडूंनी टाळणं अपेक्षित असतं. अनेकदा फलंदाज आणि गोलंदाजांनाही पिचवरून चालताना काळजी घेण्याची सूचना पंचांकडून दिली जाते. हाच नियम लक्षात ठेवून मॅथ्यू ब्रिट्झकेने पिचवरून जाणं टाळलं आणि बाजूला अशी कमालीची उडी मारली.
