मुंबई : मुंबईच्या स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी चार हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. कांगा लीग (नॉकआऊट स्पर्धेसह), आंतरमहाविद्यालयीन, कॉर्पोरेट शिल्ड या स्पर्धामध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना हे मानधन मिळेल.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बुधवारी झालेल्या कार्यकारी परिषदेमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याशिवाय मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंच्या ७० वर्षांहून अधिक वयाच्या विधवा पत्नींसाठी प्रति महिना २० हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचे निश्चित करण्यात आले.

‘एमसीए’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीची तारीख बदलून २६ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. याचप्रमाणे शुक्रवारी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत जर मतभिन्नता झाल्यास घटनेच्या दुरुस्तीसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान केले जाणार आहे, अशी माहिती ‘एमसीए’च्या सूत्रांनी दिली.

क्रिकेट सुधारणा समितीने (सीआयसी) आगामी क्रिकेट हंगामासाठी विविध वयोगटांसाठी निवड समित्या घोषित केल्या.

निवड समित्या

’  वरिष्ठ गट : सलिल अंकोला (अध्यक्ष), जितू ठाकरे, सुनील मोरे, गुलाम पारकर, प्रसाद देसाई

’  १९ वर्षांखालील गट : मयूद कद्रेकर (अध्यक्ष), विक्रांत येलिगट्टी, भरत कर्णिक, जेपी जाधव, रवी गडियार

’  १६ वर्षांखालील गट : सुरेश शेट्टी (अध्यक्ष), इक्बाल ठाकूर, उमेश गोटिखडकर, फैझल शेख, सचिन खर्ताडे

’  १४ वर्षांखालील गट : अशोक ईश्वलकर (अध्यक्ष), सुधाकर हरमलकर, केर्सी पावरी, अमोल भालेकर, निलेश पटवर्धन