मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) २०२६-२७ च्या हंगामापूर्वी खेळाडूंशी वार्षिक करार करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना करारान्वित करणारी ‘एमसीए’ देशातील पहिली राज्य क्रिकेट संघटना ठरली आहे. खेळाडूंची ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा गटांत विभागणी करण्यात येणार आहे.

‘अ’ गटातील खेळाडूंना प्रत्येक वर्षी १२ लाख ते २० लाख रुपये, ‘ब’ गटातील खेळाडूंना ८ लाख ते १२ लाख रूपये देण्यात येतील. ‘क’ गटातील खेळाडूंना ८ लाख रुपये मिळतील. खेळाडूंना त्यांची कामगिरी, तंदुरुस्ती आणि निवड समितीच्या शिफारसीनुसार करार देण्यात येईल. करारांतर्गत येणार्‍या खेळाडूंना मंडळाच्या नियमानुसार सामन्याचे मानधन, दैनिक भत्ते आणि कामगिरीच्या आधारे प्रोत्साहन रक्कमही मिळेल.

‘‘मुंबई क्रिकेटसाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे. खेळाडूंच्या कराराची घोषणा करणारी ‘एमसीए’ ही पहिली संघटना असल्याचा अभिमान आम्हाला आहे. मुंबईच्या खेळाडूंना यामुळे नक्कीच फायदा होईल. मुंबई क्रिकेटची पुढील पिढी घडविण्यासही यामुळे मदत होणार आहे,’’ असे ‘एमसीए’ अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले. अनेक खेळाडू हे मुंबईचे प्रतिनिधित्व करून चांगली कामगिरी करतात. मात्र, ते ‘आयपीएल’च्या कुठल्याही संघात सहभागी नाहीत. अशा खेळाडूंना या कराराचा फायदा मिळू शकेल.

‘बीसीसीसीआय’प्रमाणेच मानधन

‘एमसीए’ने २०२४ मध्ये महत्त्वाचा निर्णय घेताना रणजी संघातील खेळाडूंना ‘बीसीसीसीआय’प्रमाण सामन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. ‘बीसीसीआय’ ४० हजार ते ६० हजारदरम्यान सामन्याचे मानधन देते. क्रिकेटपटूंनी कारकीर्दीत किती सामने खेळले आहेत, यावर ते अवलंबून असते.

करारासाठी नियम काय

  • खेळाडू ‘एमसीए’ नोंदणीकृत असावा
  • खेळाडूने ‘एमसीए’ने ठरविलेले तंदुरुस्तीचे निकष पूर्ण करावे
  • गेल्या दोन हंगामात खेळाडूने भारताचे कोणत्याही प्रारूपात प्रतिनिधित्व केलेले नसावे
  • गेल्या दोन हंगामात ‘आयपीएल’ संघाने खेळाडूची निवड केलेली नसावी
  • निवड समितीकडून खेळाडूच्या नावाची शिफारस

कोणाला किती रक्कम

  • ‘अ’ श्रेणी : १२ ते २० लाख
  • ‘ब’ श्रेणी : ८ ते १२ लाख
  • ‘क’ श्रेणी : ८ लाख