मेलबर्न : ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी बनविण्यात आलेली खेळपट्टी गोलंदाजांना साथ करणारी होती. असे असले तरी सामना केवळ दोन दिवसांत संपल्याने मलाच धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचे (एमसीजी) क्युरेटर अर्थात खेळपट्टी देखरेखकार मॅथ्यू पेज यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी याच मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला तेव्हा सामना पाचव्या दिवशी संपला होता. त्यावेळी खेळपट्टीवर ७ मि.मी. एवढे गवत ठेवण्यात आले होते. आता ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटीसाठी खेळपट्टीवर १० मि.मी. गवत ठेवण्याचा निर्णय पेज यांनी घेतला आणि तो त्यांच्यावरच उलटला. अवघ्या सहा सत्रांत केवळ १४२ षटकांत ३६ गडी बाद झाले. त्यामुळे सामना दोन दिवसांतच संपला.
‘‘पहिल्या दिवशी २० फलंदाज बाद झाल्यावरच मलाच धक्का बसला. कसोटी सामना रोमांचक व्हावी या हेतूने खेळपट्टी तयार करण्यात आली होती. प्रत्यक्षात सामन दोनच दिवसांत संपल्याने आम्ही निराश आहोत. आम्ही यातून योग्य तो बोध घेऊ आणि भविष्यात अधिक चांगली खेळपट्टी तयार करू,’’ असेही पेज म्हणाले.
सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानेही पूर्णपणे गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर टीका केली होती. अन्य देशात असे झाले असते, तर टीकेची झोड उठली असती, असे स्टोक्स म्हणाला होता.
‘‘सामना चार-पाच दिवस चालेल असे आम्हाला वाटले होते. फलंदाज आणि गोलंदाजांना समान संधी देण्यासाठी प्रयत्नशील होतो. चेंडू हवेत अधिक प्रमाणात सीम होत होता. यामुळे दोन्ही संघातील फलंदाजांना संघर्ष करावा लागला. कसोटीच्या चौथ्या दिवशी उष्ण हवामानाचा अंदाज असल्यामुळेच खेळपट्टीवर अतिरिक्त गवत ठेवण्यात आले होते. मात्र, सामना केवळ दोन दिवसांतच संपल्याने आमची योजना अपयशी ठरली,’’ असे पेज यांनी नमूद केले.
माजी खेळाडूंकडूनही ताशेरे
मेलबर्न कसोटीत एकाही फिरकी गोलंदाजाने षटक टाकले नाही. उपखंडात इतका वेळ वेगवान गोलंदाजांनी एकही षटक टाकले नसते, तर काय गोंधळ उडाला असता, याचा विचार करा! – आकाश चोप्रा, भारताचा माजी सलामीवीर
जेव्हा भारतात कसोटीच्या पहिल्या दिवशी असे झटपट फलंदाज बाद होतात, तेव्हा नेहमी टीका होते. आता ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने दोन दिवसांत संपले आहेत. त्यांच्यावरही टीका झाली पाहिजे. न्याय सर्वांसाठी सारखा असावा. – केविन पीटरसन, इंग्लंडचा माजी कर्णधार
भारतात फिरकी गोलंदाजांसाठी खेळपट्ट्या तयार केल्या की टीका केली जाते. ऑस्ट्रेलियात तर वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्ट्या तयार केल्या गेल्या. फिरकी गोलंदाजांचा सहभागच नव्हता. पण या वेळी कुणीही टीका करताना दिसत नाही, हे दुर्दैव. – दिनेश कार्तिक</strong>, भारताचा माजी यष्टिरक्षक
खेळपट्टीने गोलंदाजांना खूप साथ केली. दोन्ही संघांतील फलंदाजांसाठी हे सोपे नव्हते. खेळपट्टीकडून गोलंदाजांना इतकी साथ मिळणे हे फलंदाजांसाठी अन्यायकारक होते. – मायकल वॉन, इंग्लंडचा माजी कर्णधार खेळपट्टीवर ७ मि.मी. गवत पुरेसे ठरले असते. क्युरेटरने कदाचित तिसऱ्या-चौथ्या दिवसाचा विचार केला असावा. रोलरच्या वापरामुळे खेळपट्टीवर परिणाम झाला असावा. – ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज
