टाळेबंदीतील अथक परिश्रमांमुळे पदककमाई!

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सराव करणे अत्यंत अवघड झाले होते.

आठवडय़ाची मुलाखत : ज्योती सुरेखा व्हेन्नम, भारतीय तिरंदाज

अन्वय सावंत

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सराव करणे अत्यंत अवघड झाले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी करोनाची दुसरी लाट कमी झाल्यावर स्टेडियममध्ये जाऊन सराव करण्याची परवानगी मिळाली आणि त्यानंतर केलेल्या अथक परिश्रमांचे आता फळ मिळाले आहे, असे मत भारताची आघाडीची तिरंदाज ज्योती सुरेखा व्हेन्नमने व्यक्त केले.     

ढाका येथे नुकत्याच झालेल्या आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात २५ वर्षीय ज्योतीने वैयक्तिक सुवर्ण आणि मिश्र सांघिक गटात ऋषभ यादवच्या साथीने रौप्यपदक पटकावले. त्याआधी सप्टेंबरमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतही तिने तिहेरी रौप्यपदकांची कमाई केली होती. या यशाबाबत ती समाधानी असून आगामी स्पर्धात याहून चांगली कामगिरी करण्याचे ध्येय तिने बाळगले आहे. याच पाश्र्वभूमीवर ज्योतीशी केलेली खास बातचीत-   

* जागतिक स्पर्धेनंतर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेत्या कामगिरीबाबत काय सांगशील?

सलग दोन मोठय़ा स्पर्धामध्ये पदक जिंकल्यामुळे नक्कीच आनंदित आहे. आम्ही प्रत्येक स्पर्धेत अग्रस्थानी येण्यासाठी, पदक मिळवण्यासाठीच सहभागी होतो. मला या दोन्ही स्पर्धामध्ये यशस्वी कामगिरी करताना एकूण पाच पदके जिंकता आली, याचे समाधान आहे. आगामी स्पर्धामध्ये यापेक्षाही दर्जेदार कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे.

* करोनानंतर स्पर्धाना सुरुवात झाल्यापासून तू सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेस. हे यश मिळवण्यासाठी तू दरम्यानच्या काळात कशा प्रकारे मेहनत घेतलीस?

मागील वर्षी मार्चमध्ये करोनाला सुरुवात झाल्यापासून नोव्हेंबपर्यंत माझा सराव पूर्णपणे बंद होता. त्यानंतर मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेत होते. मात्र, तितक्यातच करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा सरावावर परिणाम झाला. परंतु काही महिन्यांपूर्वी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सोनिपत येथील स्टेडियम उघडण्यात आले आणि तिथे मी झोकात सरावाला सुरुवात केली. मागील काही महिन्यांत केलेल्या अथक परिश्रमांचेच आता मला फळ मिळाले आहे.

* भारताच्या तिरंदाजांची मागील दोन स्पर्धातील कामगिरी वरिष्ठ खेळाडू म्हणून तुझ्यासाठी कितपत समाधानकारक होती?

माझ्या सहकाऱ्यांनी जागतिक आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धात खूप चांगली कामगिरी केली. या दोन्ही स्पर्धासाठीच्या भारतीय तिरंदाजी संघात माझ्यापेक्षाही जास्त अनुभव असलेल्या काही खेळाडूंचा समावेश होता. आम्ही देशाला पदके जिंकवून देऊ शकलो, याचा अभिमान वाटतो.

* तुझ्या तिरंदाजीच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?

मी सुरुवातीला जलतरण करत होते. मात्र, आई-वडिलांची इच्छा आणि त्यांच्या सल्ल्यामुळे मी वयाच्या ११व्या वर्षी तिरंदाजीकडे वळले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे माझा आत्मविश्वास आपोआपच वाढला आणि मी यशस्वी कामगिरी करण्यास सुरुवात केली.

* जागतिक आणि आशियाई स्पर्धेतील यशानंतर आता तू कोणते लक्ष्य डोळय़ासमोर ठेवले आहेस?

पुढील वर्षी तिरंदाजी विश्वचषक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा या तीन महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक मेहनत घेत या स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करण्याचा आणि देशासाठी जास्तीत जास्त पदके जिंकण्याचा माझा व सर्वच भारतीय तिरंदाजांचा प्रयत्न असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Medal hard work lockout ysh

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या