‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या खेळाडूंवर मध्यंतरी बंदी घालण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने, या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी लोकपालाची नेमणूक करत याविषयी निर्णय घेण्याचे आदेश दिले. या दोन्ही खेळाडूंच्या वर्तणुकीमुळे बीसीसीआय आणि भारतीय संघाला टीकेचा सामना करावा लागला. या प्रकरणातून धडा घेत, हॉकी इंडियानेही आपल्या संघाला कानपिचक्या दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणांमध्ये असताना, पत्रकार आणि कॅमेऱ्यासमोर विराटसारखं वागा, हार्दिक पांड्याचा आदर्श ठेऊ नका. बंगळुरुत झालेल्या राष्ट्रीय शिबीरात मीडिया ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये भारतीय हॉकीपटूंना या सुचना देण्यात आल्या आहेत.

या वर्कशॉपमध्ये, भारतीय हॉकीपटूंना राहुल आणि पांड्याच्या कॉफी विथ करण कार्यक्रमाची क्लिप दाखवण्यात आली. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि प्रसारमाध्यमांसमोर बोलत असताना काय बोलावं आणि काय बोलू नये याची कल्पना हॉकीपटूंना देण्यात आली. अनेक हॉकीपटू हा स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत असल्यामुळे एखाद्या घटनेचे राष्ट्रीय पातळीवर किती मोठे पडसाद पडू शकतात हे त्यांना माहिती नसणं. त्यामुळे खेळाडूंना सर्व गोष्टींची कल्पना असावी यासाठी, या सत्राचं आयोजन करण्यात आल्याचं, हॉकी इंडियातील एका अधिकाऱ्याने सांगितलं.

अवश्य वाचा – सुलतान अझलन शहा स्पर्धेसाठी हॉकी संघाची घोषणा, मनप्रीतकडे संघाचं नेतृत्व

याचवेळी हॉकीपटूंना २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीत, भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्याचा व्हिडीओ दाखवण्यात आला. यावेळी पराभवानंतरही विराट पाकिस्तानी संघातील खेळाडूंशी हसत-खेळत वागत होता. त्यामुळे एखादा सामना गमावल्यानंतर आपण स्वतःवर कसं नियंत्रण ठेवलं पाहिजे याचेही धडे हॉकीपटूंना देण्यात आले. भारतीय हॉकीपटूंचे अनेक चाहते देशभरात आहेत. अनेक तरुण खेळाडू हॉकीपटूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मैदानाता येतात. त्यामुळे हॉकीपटूंना या गोष्टीची जाण असणं गरजेचं असल्याचं, हॉकी इंडियाच्या सीईओ एलेना नॉर्मन यांनी म्हटलं आहे.