संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी किल्ला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ११ हजार पानी आरोपपत्रात चेन्नई सुपर किंग्जचा टीम प्रिन्सिपल गुरुनाथ मय्यपन याच्यासह अभिनेता विंदू दारा सिंग याच्यावर जुगार, सट्टेबाजी, कारस्थान रचणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात अद्याप २४ आरोपींना अटक होणे बाकी असून त्यात १५ पाकिस्तानी सट्टेबाजांचाही समावेश आहे.
दिल्ली पोलिसांनी खेळाडूंचा आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंगचा सहभाग उघड केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सट्टेबाजांना अटक करून आयपीएलमधील सट्टेबाजीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली होती. याप्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर शनिवारी मुंबईच्या किल्ला न्यायलयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक मुंबई, पुण्यासह राजस्थान, दिल्ली, गोवा, चेन्नई आदी राज्यात जाऊ न आले होते.

असद रौफही लावायचा सट्टा
सट्टेबाजीची कुणकुण लागताच पाकिस्तानी पंच असद रौफ भारतातून निसटला होता. आतापर्यंत असद रौफ केवळ सट्टेबाजांकडून महागडय़ा भेटवस्तू स्वीकारत होता असा समज होता. परंतु असद रौफ हासुद्धा सामन्यांमध्ये सट्टा लावत असल्याचे निष्पन्न झाले आहे. फरार रौफच्या अटकेसाठी ‘एलआर’ प्रक्रिया सुरू केल्याचेही पोलिसांनी सांगितले. चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मय्यपन हा स्वत:च्या संघावरही सट्टा लावत होता. संपूर्ण आयपीएल सामन्यात अटक होईपर्यंत तो किमान एक कोटी रुपये हरल्याची माहिती रॉय यांनी दिली.

मी निदरेष आहे -रौफ
कराची : स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी मी निदरेष आहे, असा दावा पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच असाद रौफ यांनी केला आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान त्यांचे सट्टेबाजांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते व त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ‘‘आपल्याला हेतूपूर्वक या प्रकरणी गोवण्यात आले आहे. कोणत्याही सट्टेबाजाला मी कधीही भेटलेलो नाही. क्रिकेटमुळे मला हजारो मित्र लाभले आहेत. परंतु विंदू दारा सिंग ही व्यक्ती कोण आहे, हे मला माहीत नाही. मी त्याला कधीही भेटलेलो नाही. माझ्यावर पैसे स्वीकारल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवावे,’’ असे रौफ यांनी सांगितले. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी रौफ यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ‘‘याबाबत मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे(आयसीसी)च्या भ्रष्टाचारविरोधी समितीला लिहिणार आहोत. पोलिसांप्रमाणेच त्यांच्याकडूनही या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल व मी निदरेष आहे हे सिद्ध होईल. याचप्रमाणे कायदेशीर सल्लागाराचीही मदत मी घेणार आहे,’’ असेही रौफ यांनी सांगितले.
११,६०९ पाने, ४६ आरोपी, ६१ पंचनामे
गुन्हे शाखेच्या वतीने एकूण ११,६०९ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अन्य २४ आरोपी फरार आहेत. फरार आरोपींमध्ये १५ पाकिस्तानी, तर दोन दुबईमधील सट्टेबाज तसेच वादग्रस्त पाकिस्तानी पंच असद रौफ यांचा समावेश आहे. या प्रकरणात एकूण २०५ साक्षीदार तपासले असून ६१ पंचनाम्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पोलिसांना एकूण चार ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते. त्यात सट्टेबाज राहात असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजचा समावेश आहे. संपूर्ण अटकसत्रामध्ये एक कोटी २९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. याशिवाय १५० मोबाइल, पाच लॅपटॉप, तीन आयपॅड आणि ४० सीमकार्डस, हिशेबाची पुस्तके जप्त करण्यात आली होती. आरोपपत्रात १२ आवाजाच्या नमुन्यांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी दिली.

स्पॉट-फिक्सिंगचा आरोप नाही.. दाऊद संबंधही नाही!
या आरोपपत्रातील आरोपींवर सट्टेबाजी, जुगार, कटकारस्थान रचणे आदी गुन्ह्णाांखाली आरोप दाखल करण्यात आले आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आरोपींवर आयटी कलमांनुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. मात्र मॅच- फिक्सिंग किंवा स्पॉट-फिक्िंसग केवळ खेळाडूच करू शकतात. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. या प्रकरणात १५ पाकिस्तानी सट्टेबाजांचा समावेश आहे. हे सट्टेबाज अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित आहेत. परंतु दाऊदचा प्रत्यक्ष सहभागाचे पुरावे सापडलेले नसल्याने या आरोपपत्रात दाऊदचे नाव नसल्याचे रॉय यांनी सांगितले.