बेलग्रेड : भारताच्या आकाश सांगवान (६७ किलो) आणि शिवा थापा (६३.५ किलो) यांनी एआयबीए जागतिक पुरुष बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पदार्पणवीर रोहित मोरलाही विजयी सलामी देण्यात यश आले.

राष्ट्रीय स्पर्धेतील गतविजेत्या आकाशने पहिल्या फेरीत तुर्कीच्या फुर्कान अदेमचा ५-० असा धुव्वा उडवला. त्याची पुढील फेरीत जर्मनीच्या डॅनियल क्रोटेरशी लढत होईल. तसेच थापाने केनियाच्या व्हिक्टर न्यादेरालाही ५-० अशी धूळ चारली. दुसऱ्या फेरीत त्याच्यापुढे जॉन ब्राऊनचे आव्हान असेल. त्याआधी, ५७ किलो वजनी गटात रोहितने इक्वेडोरच्या जीन कैसेडोचा पराभव करत भारताला विजयी सुरुवात करून दिली. याव्यतिरिक्त दीपक भोरियाने ५१ किलो वजनी गटात किर्गीस्तानच्या अजत उसेनालिएव्हचा ५-० असा फडशा पाडून पुढील फेरीतील स्थान सुनिश्चित केले.

भारताच्या सचिन कुमार (८० किलो) आणि आशियाई विजेता संजीत (९२ किलो) यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. सचिनची पहिली लढत ३० ऑक्टोबरला, तर संजीतची पहिली लढत २९ ऑक्टोबरला होईल. ५१ किलो वजनी गटात दीपक कुमार पहिल्या फेरीत अझात उसेनालीव्हविरुद्ध लढेल.