लुसाने : पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान संघांना पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतही एकाच ‘ड’ गटात स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा या वर्षी नेदरलँड्स आणि बेल्जियम यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. गटात बलाढ्य इंग्लंड आणि वेल्स हे अन्य दोन संघ असतील.

ॲमस्टरडॅममधील ऐतिहासिक वागेनर स्टेडियमवर स्पर्धेचा गट विभागणी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच वेळी महिला विश्वचषक स्पर्धेची देखील गटवारी निश्चित करण्यात आली. ही स्पर्धा १५ ते ३० ऑगस्ट दरम्यान होणार असून, भारतीय महिला संघाचा चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत ‘ड’ गटातच समावेश करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) दिलेल्या माहितीनुसार, पुरुष आणि महिला गटातील सर्व साखळी सामने नेदरलँड्समध्ये होणार आहेत. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

भारतात २०२३ मध्ये भुवनेश्वर येथे बेल्जियमचा पराभव करून तिसरे विश्वविजेतेपद मिळवणारा गतविजेता जर्मनीचा पुरुष संघ बेल्जियम, फ्रान्स आणि मलेशियासह ‘ब’ गटात आहे.

भारत-पाकिस्तान सामना १९ ऑगस्टला

विश्वचषक हॉकी स्पर्धेची गटवारी निश्चित झाल्यावर २४ तासांत आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. भारताचा सलामीचा सामना १७ ऑगस्टला वेल्सविरुद्ध होईल. त्यानंतर १८ ऑगस्टला इंग्लंडविरुद्ध आणि सर्वात शेवटी १९ ऑगस्टला पाकिस्तानशी खेळेल. महिला संघ सलामीला १६ ऑगस्ट रोजी चीनशी आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका (१८ ऑगस्ट) आणि इंग्लंडशी (२० ऑगस्ट) खेळेल.

पुरुष

  • ‘अ’ गट : नेदरलँड्स, अर्जेंटिना, न्यूझीलंड, जपान
  • ‘ब’ गट : बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, मलेशिया
  • ‘क’ गट : ऑस्ट्रेलिया, स्पेन, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका
  • ‘ड’ गट : इंग्लंड, भारत, पाकिस्तान, वेल्स

महिला

  • ‘अ’ गट : नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, चिली, जपान
  • ‘ब’ गट : अर्जेंटिना, जर्मनी, अमेरिका, स्कॉटलंड
  • ‘क’ गट : बेल्जियम, स्पेन, न्यूझीलंड, आयर्लंड
  • ‘ड’ गट : चीन, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका