पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धा: जेतेपद राखण्याचे बेल्जियमचे उद्दिष्ट! आज अंतिम लढतीत जर्मनीचे आव्हान | Men World Cup Hockey Tournament Germany challenge in the final match amy 95 | Loksatta

पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धा: जेतेपद राखण्याचे बेल्जियमचे उद्दिष्ट! आज अंतिम लढतीत जर्मनीचे आव्हान

बेल्जियमचा संघ रविवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेत आपले विजेतेपद राखण्याच्याच इराद्याने मैदानात उतरेल, तेव्हा अंतिम फेरीत त्यांच्यापुढे जर्मनीचे आव्हान असेल.

tom bun
(टॉम बून)

पीटीआय, भुवनेश्वर

बेल्जियमचा संघ रविवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेत आपले विजेतेपद राखण्याच्याच इराद्याने मैदानात उतरेल, तेव्हा अंतिम फेरीत त्यांच्यापुढे जर्मनीचे आव्हान असेल.बेल्जियमने विजेतेपद राखल्यास अशी कामगिरी करणारा तो चौथा हॉकी संघ ठरेल. यापूर्वी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या संघांनाच सलग दोन विश्वचषकांत विजेतेपद मिळविण्याची कामगिरी करता आली आहे. दहा वर्षांपूर्वीच हॉकीविश्वात चमकायला लागल्यापासून बेल्जियमचा संघ दुसऱ्यांदा विजेतेपदाची लढत खेळणार आहे. बेल्जियमने २०१८ मध्ये याच किलगा स्टेडियमवर पहिले विजेतेपद मिळवले होते.

जागतिक विजेतेपदापाठोपाठ ऑलिम्पिक विजेतेपद ही बेल्जियमची कामगिरी थक्क करणारी आहे. हॉकीतील सर्वोत्तम आक्रमक आणि बचावपटू बेल्जियमच्या संघात आहेत. पेनल्टी कॉर्नरचेही तंत्र त्यांनी चांगले अवगत केले आहे. बेल्जियमने स्पर्धेत सर्वाधिक १८ गोल केले असून, केवळ पाच गोल स्वीकारले आहे. टॉम बूनने सर्वाधिक सात गोल केले आहेत.

या वेळी बेल्जियमला स्पर्धेत कमालीचा लवचीक खेळ करणाऱ्या जर्मनीचा सामना करावा लागेल. या वर्षी दोन वेळा दोन गोलच्या पिछाडीवरून जर्मनीने विजय मिळवला आहे. मैदानी खेळातील वेग आणि संयम ही जर्मनीच्या खेळाची बलस्थाने असतील. यापूर्वी २००२, २००६ अशा लागोपाठ विजेतेपदांचा अनुभव जर्मनीच्या गाठीशी आहे.

भारताला संयुक्त नववे स्थान
पहिल्या आणि चौथ्या सत्रात प्रत्येकी दोन गोल करत भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा ५-२ असा पराभव करून विश्वचषक हॉकी स्पर्धेत अर्जेटिनासह संयुक्त नववे स्थान मिळवले. अर्जेटिनाने वेल्सला ६-० असे पराभूत केले. भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला असला, तरी या सामन्यातही भारताला पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवता आला नाही. भारताला सहापैकी एकाच कॉर्नरवर गोल नोंदवता आला. भारताकडून आकाशदीपने दोन, तर हरमनप्रीत सिंग, समेशर सिंग, सुखजीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. दक्षिण आफ्रिकेसाठी म्विम्बी सामकेलो, कासिम मुस्तफा यांनी गोल नोंदवले. भारतीय १९९८ आणि २०१४ नंतर तिसऱ्यांदा नवव्या स्थानावर राहिला.

वेळ : सायं. ७ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फस्र्ट, सिलेक्ट २, फॅनकोड ॲप

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 04:29 IST
Next Story
जोकोव्हिचला रोखण्याचे त्सित्सिपासपुढे आव्हान!