पीटीआय, नवी दिल्ली : कारकीर्दीतील अडथळय़ांचा सामना केल्याने मानसिकदृष्टय़ा कणखर बनले, अशी भावना जगज्जेती बॉक्सिंगपटू निखत झरीनने व्यक्त केली. तुर्की येथे गुरुवारी झालेल्या ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत निखतने थायलंडच्या जितपोंग जुतामासचा ५-० असा पराभव केला.

‘‘दोन वर्षांत माझ्या खेळावर मी लक्ष केंद्रित केले आणि चुकांवर मेहनत घेत खेळ सुधारण्यांवर भर दिला. यासह माझ्या सकारात्मक बाबींवर मेहनत घेत स्वत:ला मजबूत केले. कारकीर्दीतील अडथळय़ांमुळे मी मानसिकदृष्टय़ा कणखर बनली. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीचा सामना करावा लागला तरीही हार मानायची नाही आणि सर्वोत्तम कामगिरी करायची असा निर्धार मी केला,’’ असे निखत म्हणाली.

झरीनच्या सोनेरी कामगिरीच्या दोन वर्षे आधी तिने तत्कालीन क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून ऑलिम्पिक पात्रतेसाठी निष्पक्ष निवड चाचणी घेण्याची विनंती केली होती. यामुळे झरीनवर समाजमाध्यमांवर टीका झाली होती. तसेच, मेरी कोमने ‘‘निखत झरीन कोण?’’ असे विचारले होते. निवड चाचणीत मेरी कोमकडून पराभूत झाल्याने टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेची तिची संधी हुकली. निखतला खांद्याच्या दुखापतीमुळे जवळपास वर्षभर रिंगणाबाहेर रहावे लागले. त्यामुळे राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा यासारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये तिला सहभागी होता आले नाही.

‘‘२०१७मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे मला शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यामुळे मला वर्षभर स्पर्धेत सहभागी होता आले नाही. २०१८मध्ये मी पुनरागमन केले. मात्र, मला चांगली कामगिरी करता आली नाही. मी हार न मानता २०१९मध्ये पुनरागमन केले आणि मागे वळून पाहिले नाही. मी स्पर्धाकडे संधी म्हणून पाहिले. स्वत:वर विश्वास ठेवला. त्यामुळे मी इथवर पोहोचू शकले,’’असे झरीनने सांगितले. झरीनचे लक्ष्य राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा निवड चाचणी असून ती ५० किलो वजनी गटात सहभागी होणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जागतिक विजेत्या निखत झरीनचे कौतुक केले आहे. निझामाबाद जिल्ह्याच्या निखतने इस्तंबूल येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याने मुख्यमंत्र्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षितिजावर भारताचा झेंडा फडकवल्याने तिचे कौतुकही केले, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

धावपटू ते बॉक्सिंगपटू

मी मुलींना मैदानावर खेळायला घेऊन गेलो, जेणेकरून त्यांना शिकायला मिळेल. निखतकडे पाहून मला जाणीव झाली ती खेळाडू बनू शकते, असे  निखतचे वडील माजी फुटबॉल आणि क्रिकेटपटू मोहम्मद जमील यांनी सांगितले. जमील यांनी निखतला १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीचा सराव दिला आणि काही काळातच ती जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेती झाली. यानंतर बॉक्सिंगकडे ती आकर्षित झाली आणि निझामाबादमध्ये मुलांसोबत सराव करू लागली. ‘‘आमचा परिसर ग्रामीण होता. येथे खेळाबाबत लोकांना अधिक माहिती नाही. जेव्हा तिने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकले तेव्हा लोकांना कळले,’’ असे जमील यांनी सांगितले.