‘कोपा अमेरिका’वर मोहोर अर्जेटिनाची.. चर्चा मात्र मेसी-नेयमार आलिंगनाची

रिओ डी जानेरो : ब्राझील वि. अर्जेटिना.. फुटबॉलमधील लॅटिन अमेरिकी म्हणवल्या जाणाऱ्या शैलीतील दोन सर्वाधिक प्रतिभावान संघ. कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी ऐतिहासिक मराकाना मैदानावर ते भिडले त्या वेळी उच्च दर्जाच्या फुटबॉलची जगभरातील प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण झालीच असे म्हणता येत नाही. या सामन्याचे वर्णन मेसी वि. नेयमार असेही केले गेले. अखेरीस राष्ट्रीय संघासाठी एक तरी महत्त्वाची स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न या दोघांपैकी मेसीने पूर्ण केले. घरच्या मैदानावर इतक्या मोलाच्या सामन्यात पराभूत झाल्याने विदीर्ण होऊनही नेयमारने मेसीचे आवर्जून अभिनंदन केले. मेसीनेही त्याचे सांत्वन केले. त्यांच्या भेटीत सुख-दु:ख विरघळले आणि उरले केवळ मैत्र!

दोघेही आपापल्या संघांचे हुकमी खेळाडू, त्यामुळे सामनोत्तर मैत्राचा लवलेशही त्यांच्या खेळात सापडणे अशक्यच होते. एके काळी बार्सिलोना संघातून हे दोघेही एकत्र क्लब फुटबॉल खेळले; परंतु या सामन्यात दोघांनाही प्रतिस्पर्धी संघातील बचावपटूंनी निष्ठुरपणे रोखण्याची एकही संधी सोडली नाही. एका क्षणी तर लॅटिन अमेरिकेतील हे सर्वाधिक लोकप्रिय फुटबॉलपटू वेगवेगळ्या ठिकाणी भुईसपाट झाले होते. या दोन महान संघांतील सामन्यात कौशल्याऐवजी धसमुसळेपणातच परस्परांवर कुरघोडी सुरू होती. अखेरीस २८ वर्षांची अर्जेटिनाची नि १४ वर्षांची मेसीची प्रतीक्षा सुफळ संपुष्टात आली. तर मराकाना मैदानावर आणखी एक वेदनादायी पराभव पाहण्याची वेळ ब्राझिलियन संघ आणि प्रेक्षकांवर आली. पण फुटबॉलमधील मैत्रभाव अजूनही जागृत असल्याची आश्वासक अनुभूती मेसी-नेयमार भेटीने जगाला मिळाली. कोविड-१९च्या सावटाखाली खेळवल्या गेलेल्या यंदाच्या कोपा अमेरिकाची हीच शाश्वत स्मृती.