scorecardresearch

मेसीला बॅलन डी’ओर पुरस्काराच्या यादीतून वगळले!

सात वेळा विजेत्या लिओनेल मेसीला प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी यंदा ३० जणांच्या नामांकितांच्या यादीमध्ये स्थान मिळालेले नाही.

मेसीला बॅलन डी’ओर पुरस्काराच्या यादीतून वगळले!
लिओनेल मेसी

निऑन : सात वेळा विजेत्या लिओनेल मेसीला प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी यंदा ३० जणांच्या नामांकितांच्या यादीमध्ये स्थान मिळालेले नाही. २००५ सालानंतर प्रथमच मेसीविना बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी नामांकितांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

अर्जेटिनाचा कर्णधार मेसीने पोलंडचा आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीला मागे टाकत गेल्या वर्षी सातव्यांदा बॅलन डी’ ओर पुरस्कार मिळवला होता. पॅरिस सेंट-जर्मेनकडून पहिल्या हंगामात खेळताना समाधानकारक कामगिरी न करता आल्याने मेसीला यंदा नामांकन देण्यात आले नाही. ३५ वर्षीय मेसीने २०१९मध्येही हा पुरस्कार पटकावला होता. करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०मध्ये हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता.

लेवांडोवोस्की, किलियान एम्बापे, करीम बेन्झिमा, अर्लिग हालंड आणि पाच वेळा विजेता ख्रिस्तिआनो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा बॅलन डी’ओर पुरस्कारासाठीच्या नामांकितांच्या यादीत समावेश आहे. यासह मोहम्मद सलाह, सादिओ माने, केव्हिन डीब्रूएने, हॅरी केन आणि सॉन ह्युंग-मिन हेसुद्धा या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत.

मँचेस्टर सिटीकडून डीब्रूएने आणि हालंड यांच्यासह फिल फोडेन, जोओ कॅन्सेलो, रियाद महरेझ, बर्नाडरे सिल्वा यांना, तर लिव्हरपूलकडून ट्रेंट अ‍ॅलेक्झांडर-आर्नोल्ड, लुइस डियाझ, फॅबिनिओ, डार्विन नुनेझ, सलाह आणि व्हर्जिल व्हॅन डाइक यांचाही या यादीत समावेश आहे.

सेनेगलला पहिल्यांदा आफ्रिकन चषक जिंकवून देणारा माने यंदा लिव्हरपूल संघ सोडून बायर्न म्युनिचच्या संघात दाखल झाला आहे. चॅम्पियन्स लीग विजेत्या रियाल माद्रिदच्या बेन्झिमासह कॅसेमिरो, थिबो कोर्टवा, लुका मॉडरिच, व्हिनिसियस ज्युनियर आणि अँटोनिओ रूडिगा या सहा खेळाडूंना यादीत स्थान मिळाले आहे. या पुरस्काराचे वितरण १७ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या