ला लिगा फुटबॉल

विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या लिओनेल मेसीने रविवारी मध्यरात्री आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. मेसीने बार्सिलोनासाठी विक्रमी ६५०वा गोल नोंदवून संघाला ला लिगा फुटबॉलमध्ये अ‍ॅथलेटिक बिलबाओ क्लबवर २-१ असा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

काही दिवसांपूर्वीच स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अ‍ॅथलेटिक क्लबने बार्सिलोनावर ३-२ अशी सरशी साधली होती. या लढतीत मेसीला कारकीर्दीत प्रथमच लाल कार्ड दाखवण्यात आले होते. परंतु रविवारी अखेर मेसीसह बार्सिलोनाने त्या पराभवाची परतफेड करताना गुणतालिकेच्या दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बार्सिलोनासाठी ३३ वर्षीय मेसीने २०व्या मिनिटाला फ्री-कीकद्वारे पहिला गोल नोंदवला. त्यानंतर जॉर्डी अल्बाने (४९ मि.) स्वयंगोल केल्यामुळे अ‍ॅथलेटिक क्लबने बरोबरी साधली. मात्र अ‍ॅन्टोइन ग्रीझमनने ७४व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून बार्सिलोनाचा विजय साकारला.

बार्सिलोनाचे या विजयासह २० सामन्यांतून ४० गुण झाले आहेत. अ‍ॅटलेटिको माद्रिद १९ सामन्यांतील ५० गुणांसह गुणतालिकेच्या अग्रस्थानी विराजमान आहे. बार्सिलोनाचाच माजी खेळाडू लुइस सुआरेझच्या (२८ आणि ५० मि.) दोन गोलमुळे अ‍ॅटलेटिकोने कॅडिझवर ४-२ अशी मात केली.

लिव्हरपूलच्या विजयात सलाह चमकला

लिव्हरपूल : तब्बल पाच लढतीत गोल झळकावण्यात अपयशी ठरल्यानंतर अखेर सोमवारी मोहम्मद सलाहने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये वेस्ट हॅमला ३-१ अशी धूळ चारली. सलाहने अनुक्रमे ५७ आणि ६८व्या मिनिटाला दोन गोल केले, तर जॉर्जिनो विनाल्डमने (८४ मि.) लिव्हरपूलसाठी तिसरा गोल केला. क्रेग डॉसनने वेस्ट हॅमसाठी ८७व्या मिनिटाला एकमेव गोल केला. परंतु तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. या विजयामुळे लिव्हरपूलने (२१ सामन्यांत ४० गुण) गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले असून मँचेस्टर सिटी सर्वाधिक ४४ गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. मँचेस्टर सिटीने शेफिल्ड युनायटेडचा १-० असा पराभव करत जेतेपद आपल्याकडे राखण्याच्या दिशेने कूच केली आहे. गॅब्रियल जिजसने नवव्याच मिनिटाला सिटीसाठी निर्णायक गोल केला.