बायर्न म्युनिकने हेर्था बर्लिन संघाचा ३-१ असा पराभव करून विक्रमी वेळेत जर्मन लीग चषकाला (बुंडेसलीगा) गवसणी घातली. पेप गार्डिओला यांच्या प्रशिक्षकपदाखाली बायर्न म्युनिकने तब्बल सात सामने राखून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
बायर्न म्युनिकच्या पहिल्याच मोसमात गार्डिओला यांनी संघाला नऊ महिन्यांत तीन जेतेपदे मिळवून दिली आहेत. याआधी गार्डिओला यांच्या प्रशिक्षकपदाखाली बायर्न म्युनिकने यूएफा सुपर चषक आणि क्लब विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. बायर्न म्युनिकने २४व्यांदा जर्मन लीग चषकावर मोहोर उमटवली.
बुंडेसलीगा या जर्मनीतील प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिकने हेर्था बर्लिनविरुद्धच्या सामन्यात १५व्या मिनिटालाच दोन गोल करून वर्चस्व मिळवले होते. टोनी क्रूस आणि मारियो गोएट्झे यांनी हे गोल झळकावले होते. त्यानंतर एड्रियन रामोस याने हेर्था बर्लिनसाठी गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र फ्रँक रिबरीने तिसरा गोल लगावत बायर्न म्युनिकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील सात सामने शिल्लक असून बायर्न म्युनिकने दुसऱ्या क्रमांकावरील बोरूसिया डॉर्टमंडला २५ गुणांनी मागे टाकून अव्वल स्थान प्राप्त केले आहे.