कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या संयमी शतकाच्या बळावर श्रीलंकेने पहिल्या डावात तीनशेचा टप्पा ओलांडला. परंतु सातत्याने विकेट्स मिळवत भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव ३०६ धावांत गुंडाळत ८७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या १ बाद ७० झाल्या असून, भारताकडे १५७ धावांची आघाडी आहे. दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी वेगवान खेळ झाल्याने कसोटी निर्णायक होण्याची शक्यता वाढली आहे.
३ बाद १४० स्थितीतून पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेला मॅथ्यूज आणि लहिरू थिरिमाने यांनी सावरले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली. इशांत शर्माने थिरिमानेला साहाकडे झेल देण्यास भाग पाडत ही जोडी फोडली. त्याने ६२ धावांची खेळी केली. पहिल्या कसोटीत निर्णायक शतकी खेळी साकारणारा दिनेश चंडिमल इशांत शर्माचीच शिकार ठरला. त्याने ११ धावा केल्या. अश्विनच्या गोलंदाजीवर चौकार खेचत मॅथ्यूजने कारकिर्दीतील सहाव्या शतकाची नोंद केली. शतकानंतर लगेचच स्टुअर्ट बिन्नीने त्याला बाद केले. मॅथ्यूजने १२ चौकारांसह १०२ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. मिश्राने धम्मिका प्रसाद आणि जेहान मुबारकला बाद करत श्रीलंकेला मोठी आघाडी मिळणार नाही याची काळजी घेतली. अश्विने रंगना हेराथचा अडसर दूर केला. थरिंदू कौशलला मिश्राने बाद केले आणि श्रीलंकेचा डाव ३०६ धावांतच आटोपला. भारतातर्फे मिश्राने ४३ धावांत ४ बळी घेतले. भारताला ८७ धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुल प्रसादच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मात्र यानंतर मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी ६७ धावांची भागीदारी करत पडझड थांबवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विजय ३९ तर रहाणे २८ धावांवर खेळत आहेत. भारताकडे १५७ धावांची आघाडी आहे.
धावफलक
भारत (पहिला डाव) : ३९३
श्रीलंका (पहिला डाव) : दिमुथ करुणारत्ने पायचीत गो. यादव १, कौशल सिल्व्हा झे. अश्विन गो. मिश्रा ५१, कुमार संगकारा झे. रहाणे गो. अश्विन ३२, लहिरू थिरिमाने झे. साहा गो. इशांत शर्मा ६२, अँजेलो मॅथ्यूज झे. विजय गो. बिन्नी १०२, दिनेश चंडिमल झे. राहुल गो. इशांत शर्मा ११, जेहान मुबारक त्रि.गो. मिश्रा, धम्मिका प्रसाद झे. रहाणे गो. मिश्रा ५, रंगना हेराथ पायचीत गो. अश्विन १, थरिंदू कौशल यष्टिचीत साहा गो. मिश्रा ६, दुशमंत चमिरा नाबाद ०
अवांतर : (बाइज २, लेगबाइज ६, नोबॉल ५) १३
एकूण : १०८ षटकांत सर्वबाद ३०६
बादक्रम : १-१, २-७५, ३-११४, ४-२४१, ५-२५९, ६-२८४, ७-२८९, ८-३००, ९-३०६, १०-३०६
गोलंदाजी : इशांत शर्मा २१-३-६८-२, उमेश यादव १९-५-६७-१, स्टुअर्ट बिन्नी १८-४-४४-१, रवीचंद्रन अश्विन २९-३-७६-२, अमित मिश्रा २१-३-४३-४
भारत (दुसरा डाव) : लोकेश राहुल त्रि. गो. प्रसाद २, मुरली विजय खेळत आहे ३९, अजिंक्य रहाणे खेळत आहे २८
अवांतर : (वाइज १) १
एकूण : २९.२ षटकांत १ बाद ७०
बादक्रम : १-३
गोलंदाजी : धम्मिका प्रसाद ४-०-१२-१, रंगना हेराथ ११.२- ३-२३-०, दुशमंत चमिरा ४-०-१४-०, अँजेलो मॅथ्यूज २-१-१-०, थरिंदू कौशल ८-०-२०-०