भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI)चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या संबंधी BCCIने संबंधित कागदपत्रे चौकशी समतीकडे सुपूर्द केली आहेत. BCCIच्या प्रशासकीय समितीने (CoA) राहुल जोहरींवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीमध्ये अलाहाबाद हायकोर्टातील निवृत्त न्यायाधीश राकेश शर्मा, दिल्लीतील महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा बरखा सिंह आणि सीबीआयचे माजी संचालक पी सी शर्मा यांचा समावेश आहे. या समितीकडे BCCIने संबंधित कागदपत्रे जमा केली असून जोहरी यांच्याबाबत इतर काही आरोप असल्यास तक्रारदारांनी ९ नोव्हेंबरपर्यंत तक्रार दाखल करावी, असेही या समितीने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी हरनिध कौर यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट टाकण्यात आली होती. यात महिलेच्या नावाचा उल्लेख नव्हता. मात्र, त्या महिलेने जोहरी यांनी तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. संबंधित महिला काही वर्षांपूर्वी जोहरी यांच्यासोबत ‘डिस्कव्हरी वाहिनी’साठी काम करत होती, असे सांगितले जाते.

या ट्विटची BCCIच्या CoA ने दखल घेतली. या संदर्भात समितीने जोहरी यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. जोहरी यांनी त्यांची बाजू मांडली असून लैंगिक छळाचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. पण या प्रकरणात पारदर्शकता राहावी, यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याचा निर्णय CoAने घेतला आहे. ही समिती १५ दिवसांत चौकशी करुन याबाबतचा अहवाल बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला सादर करणार आहे. दरम्यान चौकशी पूर्ण होईपर्यंत राहुल जोहरी सक्तीच्या रजेवर असतील.