राफेल माक्र्युझ आणि हेक्टर हेरेराचे निर्णायक गोल; ३-१ असा विजय

अल्व्हेरो परेराच्या स्वयंगोलनंतर राफेल माक्र्युझ आणि हेक्टर हेरेरा यांनी अखेरच्या पाच मिनिटांत केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर मेक्सिकोने कोपा अमेरिका स्पध्रेत बलाढय़ उरुग्वेला ३-१ असे नमवून विजयी सलामी दिली. स्पध्रेची सर्वाधिक १५ जेतेपदे नावावर असलेल्या उरुग्वेला लुईस सुआरेझच्या अनुपस्थितीचा फटका बसला.

सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला उरुग्वेच्या परेराच्या स्वयंगोलने मेक्सिकोला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या धक्क्यातून उरुग्वेचा संघ सावरत असतानाच त्यांना दुसरा धक्का बसला. त्यांच्या मॅटिआस व्हेसिनोला पहिल्या सत्रात दोन वेळा पिवळे कार्ड दाखवण्यात आल्याने उरुग्वेला दुसऱ्या सत्रात दहाच खेळाडूंनी खेळ करावा लागला. मध्यंतरानंतर दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला. मात्र उरुग्वेला बरोबरी करण्यात सातत्याने अपयश येत होते. ७३व्या मिनिटाला मेक्सिकोच्या अ‍ॅण्ड्रेस गॉर्डाडोला दोनदा पिवळे कार्ड दाखवण्यात आल्यामुळे मैदान सोडावे लागले. आता दोन्ही संघ दहा-दहा खेळाडूंनी एकमेकांसमोर आव्हान उभे करीत होते. पुढच्याच मिनिटाला डिएगो गॉडिनच्या गोलने उरुग्वेला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. या गोलनंतर नवचैतन्य संचारलेल्या उरुग्वेने कामगिरीला साजेसा खेळ करीत मेक्सिकोला अडचणीत आणले. मात्र ८५व्या मिनिटाला माक्र्युझच्या गोलने मेक्सिकोला पुन्हा आघाडी मिळवून दिली. भरपाई वेळेत हेरेराने त्यात भर घालून मेक्सिकोचा ३-१ असा विजय निश्चित केला.

राष्ट्रगीतामुळे गोंधळ

उरुग्वे आणि मेक्सिको यांच्यातील सामन्याच्या सुरुवातीला चुकीचे राष्ट्रगीत वाजवण्यात आल्यामुळे काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उरुग्वेच्या राष्ट्रगीताऐवजी चिलीचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले आणि मैदानावर उभे असलेले खेळाडू एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते. या चुकीबद्दल आयोजकांनी त्वरित माफी मागितल्यामुळे निर्माण झालेला तणाव निवळला.

व्हेनेझुएलाचा विजय

दहा खेळाडूंनिशी खेळ करणाऱ्या व्हेनेझुएलाने  ‘क’ गटात जमैकावर १-० असा विजय मिळवला. १५व्या मिनिटाला जोसेफ मार्टिनेझने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. २३व्या मिनिटाला ऑस्टिनवरील कारवाईनंतरही व्हेनेझुएलाने ही आघाडी कायम राखली.