मेक्सिको सिटी : सह-यजमान मेक्सिकोच्या संघाने सलग तीन साखळी सामने जिंकत आणि एकही गोल न स्वीकारता विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीसाठीची सज्जता दाखवून दिली. ‘राउंड ऑफ ३२’ फेरीतील स्थान आधीच स्थान निश्चित असलेल्या मेक्सिको संघाने अखेरच्या साखळी लढतीत चेक प्रजासत्ताकचा ३-० असा सहज पराभव केला. या पराभवामुळे चेकिया संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
मेक्सिकोने पहिल्या दोन लढतींत अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण कोरियाचा पराभव करून गटविजेतेपद पटकावले होते. त्यामुळे प्रशिक्षक हाव्हिएर अगिरे यांनी अंतिम साखळी लढतीत संघात अनेक बदल करण्याचा निर्णय घेतला. पाच नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आणि या निर्णयाचे फळ मेक्सिकोला शानदार विजयाच्या रूपाने मिळाले.
तीनही गोल उत्तरार्धात
पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र, मध्यंतरानंतर मेक्सिकोने आक्रमणाची गती वाढवली. डाव्या बाजूचा बचावपटू (लेफ्ट बॅक) माटेओ शावेझ याने ५५व्या मिनिटाला गोल करत मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हा पहिला गोल ठरला. या गोलनंतर मेक्सिकोच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला. स्पर्धेत प्रथमच सामना सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळालेला १७ वर्षीय मध्यरक्षक जिल्बर्टो मोरा याने शानदार खेळासह सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या अचूक पासमुळे मेक्सिकोचा दुसरा गोल झाला. मोराने होर्हे सांचेझ याला गोलपोस्टकडे सुंदर चेंडू दिला. चेकियाचा गोलरक्षक मातेज कोवार याने पहिला प्रयत्न परतवून लावला, परंतु
त्यानंतर बचावफळीमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत ज्युलियन क्विनोनेस याने चेंडूला गोलजाळीची दिशा देत मेक्सिकोची आघाडी २-० अशी वाढवली. हा त्याचा या विश्वचषकातील दुसरा गोल ठरला. त्यानंतर बदली खेळाडू अल्वारो फिडाल्गो याने भरपाई वेळेत १५ यार्ड अंतरावरून त्याने अप्रतिम फटका मारत चेंडू थेट जाळ्याच्या वरच्या कोपर्यात धाडला आणि मेक्सिकोचा तिसरा गोल नोंदवला.
ओचोआसाठी उत्साह सामन्यातील गोलइतकाच उत्साह अनुभवी गोलरक्षक गिलेर्मो ओचोआ याच्या मैदानातील आगमनावेळी पाहायला मिळाला. ४० वर्षीय ओचोआला अखेरच्या काही मिनिटांसाठी मैदानात उतरवण्यात आले आणि एझ्टेका स्टेडियममध्ये उपस्थित हजारो मेक्सिकन चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. ओचोआचा हा कारकीर्दीतील सहावा आणि अखेरचा विश्वचषक आहे.
