Mumbai Indians Win opening Match of IPL After 14 Years: मुंबई इंडियन्सने केकेआरचा पराभव करत आयपीएल २०२६चा विजयाने श्रीगणेशा केला आहे. यंदाची पहिली मॅच देवाला न देता मुंबईने सांघिक कामगिरीच्या बळावर ६ विकेट्सने विजय मिळवला. यासह मुंबईने १३ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे. यासह मुंबई इंडियन्सनने २२१ धावांचं लक्ष्य गाठत आतापर्यंत संघाचं सर्वात मोठं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं. रोहित शर्मा व रायन रिकल्टन संघाच्या विजयाचे हिरो ठरले.
मुंबई इंडियन्सनने नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला. अजिंक्य रहाणे-अंगक्रिश रघुवंशी यांची अर्धशतक आणि रिंकू सिंहच्या खेळीच्या बळावर संघाने २२० धावा केल्या. तर प्रत्युत्तरात रोहित शर्मा व रिकल्टनच्या १४८ धावांच्या भागीदारीच्या बळावर सहज विजय मिळवला.
रोहित-रिकल्टनची भागीदारी ठरली सामन्याचा टर्निंग पॉईंट
कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने १९.१ षटकांत हे ऐतिहासिक लक्ष्य गाठलं. मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासातील आपलं सर्वात मोठं लक्ष्य यशस्वीरित्या गाठलं आहे. पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सचे सलामीवीर रोहित शर्मा व रायन रिकल्टन यांनी वादळी फटकेबाजी केली. रोहित-रिकल्टनने पहिल्या विकेटसाठी ७१ चेंडूत १४८धावांची भागीदारी रचली. रोहित शर्माने पॉवरप्लेमध्येच २३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर थोड्यावेळाने रिकल्टनने २४ चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं.
रोहित शर्माने या सामन्यात ३८ चेंडूत ६ चौकार व ६ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली. तर रिकल्टनने ४३ चेंडूत ४ चौकार व ८ षटकारांसह ८१ धावा केल्या. यानंतर सूर्याने ८ चेंडूत ३ चौकारांसह १६ धावा केल्या आणि रनरेट कायम ठेवला. तर तिलक वर्माने झटपट २० धावांचं योगदान दिलं. तर हार्दिकने १८ धावा तर नमन धीरने विजयी चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २२० धावांचा डोंगर उभारला होता. पण अननुभवी गोलंदाजी आक्रमणासमोर मुंबईच्या रोहित-रिकल्टनसारख्या खेळाडूंसमोर धावांचा बचाव करू शकले नाहीत. याशिवाय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे क्रॅम्प्स आल्यामुळे संघाबाहेर झाला होता. त्यापूर्वी केकेआरने दणक्यात सुरूवात केली होती. अजिंक्य रहाणे व फिन एलनने पहिल्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. अजिंक्य रहाणे ४० चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली.
रहाणेनंतर फिन एलनने १७ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ३७ धावांची खेळी केली. तर कॅमेरून ग्रीनने १८ धावांचं योगदान दिलं. याशिवाय युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीने २९ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा केल्या. तर रिंकूने २१ चेंडूत ४ चौकारांसह ३३ धावांचं योगदान दिलं.
