MI beat LSG by 8 wickets IPL 2026: मुंबईचा राजा रोहित शर्मा संघात परतला अन् मुंबई इंडियन्सने लखनौविरूद्धचा वानखेडेवरील सामना जिंकला. मुंबईने लखनौचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. लखनौने मुंबईला विजयासाठी २२९ धावांचं लक्ष्य दिलं होतं आणि मुंबईने ८ चेंडू राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचं २२९ धावा हे आयपीएल इतिहासातील यशस्वीपणे गाठलेलं सर्वात मोठं लक्ष्य ठरलं आहे.
मुंबईचा राजा रोहित शर्माने घरच्या मैदानावर या सामन्यात ८४ धावांची खेळी केली, तर रायन रिकल्टनने ८३ धावा केल्या. मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आजचा सामना करो या मरो असा होता. या सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर रोहित शर्मा परतला. तर कर्णधार हार्दिक पंड्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवने संघाचं नेतृत्त्व केलं.
लखनौ सुपर जायंट्सने दिलेल्या २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरूवात दणक्यात झाली. रायन रिकल्टन व रोहित शर्माच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६५ चेंडूत १४३ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारीच मॅचविनिंग ठरली. रायन रिकल्टन ३२ चेंडूत ६ चौकार व ८ षटकारांसह ८३ धावा करत बाद झाला. तर रोहित शर्माने ४४ चेंडूत ६ चौकार व ७ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. तिलक वर्मा ११ धावा तर कर्णधार सूर्यकुमार यादवने १२ धावांचं योगदान दिलं. यानंतर नमन धीरने पुन्हा एकदा संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. नमन धीरने १२ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह २३ धावांची खेळी केली. तर विल जॅक्सने ४ चेंडूत १० धावांची खेळी करत मुंबईला १८.४ षटकांत विजय मिळवून दिला.
लखनौ सुपर जायंट्सकडून मनिमरण सिद्धार्थने २ विकेट्स तर मोहम्मद शमी व मोहसीन खान यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने ४ षटकांत ५३ धावा तर आवेश खानने ३.४ षटकांत ५६ धावा दिल्या, ज्याचा लखनौला मोठा फटका बसला.
तत्त्पूर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत लखनौला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. लखनौची सुरूवातही चांगली झाली, पण जोश इंग्लिस १३ धावा करत गझनफरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर मिचेल मार्श व निकोलस पुरन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ९४ धावा केल्या. मार्शने २५ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. तर निकोलस पुरन आपल्या आक्रमक अंदाजात परतला आणि यंदाचं त्याने पहिलं अर्धशतक झळकावलं.
निकोलस पुरनने या सामन्यात २१ चेंडूत १ चौकार व ८ षटकारांसह ६३ धावांची वादळी खेळी केली. कार्बिन बॉशने एकाच षटकात मार्श व पुरनला झेलबाद करत संघाला मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. यानंतर ऋषभ पंत १५ धावा, अक्षत रघुवंशी ११ धावांचं योगदान दिलं. एडन मारक्रमने २५ चेंडूत ३२धावा तर हिम्मत सिंगने ४० धावांच्या खेळी केल्या. या खेळीच्या बळावर लखनौ संघ २२८ धावांपर्यंत पोहोचला. पण मधल्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्याने लखनौचा संघ २५० चा पल्ला पार करू शकला नाही.
