MI vs PBKS Match Highlights in Marathi: मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर ६ विकेट्सने पराभव केला. हा पंजाब किंग्सचा स्पर्धेतील सलग पाचवा पराभव ठरला. या पराभवासह संघाच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता पंजाबसाठी प्लेऑफ गाठणं ५० टक्केपेक्षा कमीच्या शक्यतेवर आलं आहे.
मुंबईला १८ चेंडूत ५० धावांची गरज असताना मार्को यान्सनच्या षटकात तिलक व विल जॅक्सने २२ धावा कुटल्या. यासह मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. यानंतर अर्शदीप सिंगने १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आणि नंतर चौकार मारत सामना अधिक क्लोज आणला. यासह मुंबईला विजयासाठी १५ धावांची गरज होती. झेवियर बार्टलेट अखेरचं षटक टाकण्यासाठी आला होता. जॅक्सने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि आता मुंबईला जिंकण्यासाठी ९ धावांची गरज होती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि तिसरा चेंडू निर्धाव राहिला. मग चौथ्या व पाचव्या चेंडूवर तिलकने दोन षटकार खेचत मुंबईला सामना जिंकून दिला.
पंजाब किंग्सने दिलेल्या २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली. रोहित शर्माने सावध फलंदाजी केली, तर एका टोकाकडून रायन रिकल्टने आक्रमक फटके खेळले. रायन रिकल्टन २३ चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांसह ४८ धावा करत बाद झाला. तर रोहित दोन षटकारांसह २५ धावा करत माघारी परतला. नमन धीर ९ धावा करत स्वस्तात परतला. शेरफन रूदरफोर्ड व तिलक वर्मा यांनी ४२ चेंडूत ६१ धावांची भागीदारी रचली. रूदरफोर्ड २० धावा करत बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या विल जॅक्सने तिलकच्या जोडीने संघाला विजयापर्यंत नेलं.
तिलक वर्मा व विल जॅक्स यांनी २० चेंडूत ५६ धावांची भागीदारी रचली. तिलकने या सामन्यात ३३ चेंडूत ६ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावांची मॅचविनिंग खेळी केली. तर विल जॅक्सने १० चेंडूत २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. या दोघांच्या अखेरच्या षटकांतील खेळीमुळे मुंबईने सामना जिंकला. मुंबई स्वत: प्लेऑफमधून बाहेर झाली असली तरी या विजयाचा फटका मात्र पंजाब किंग्सला चांगलाच बसला आहे.
मुंबई इंडियन्सने सामन्याची नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. प्रभसिमरन सिंगने ३२ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. तर प्रियांश आर्यने २२ धावा तर कुपर कॉनोलीने २१ धावांचं योगदान दिलं. श्रेयस अय्यर ४ धावा, सूर्यांश शेडगे ८ धावा व शशांक सिंग २ धावांवर स्वस्तात बाद झाले. अजमतुल्ला ओमरझाईने चांगली फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा पल्ला गाठून देण्यात मोठी भूमिका बजावली.
ओमरझाईने १७ चेंडूत २ चौकार व ४ षटकारांसह २२३ च्या स्ट्राईक रेटने ३८ धावांची खेळी केली. तर विष्णु विनोद व झेवियर बार्टलेट यांनी अखेरच्या षटकात महत्त्वपूर्ण धावा केल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने ४ षटकांत ४ विकेट्स घेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. याशिवाय दीपक चहरने २ विकेट्स व कॉर्बिन बॉश व राज बावा यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
