मुंबई इंडियन्सचं सख्खं भावंड असलेल्या एमआय लंडनने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. या यशासह मुंबईच्या ताफ्यात तब्बल १४ जेतेपदं आहेत.

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या नावावर ५ जेतेपदं आहेत. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशा पाच वर्षी मुंबईने जेतेपदावर नाव कोरलं. आयपीएलच्या माध्यमातून सुरू झालेल्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेतही मुंबईने छाप उमटवली. या स्पर्धेची दोन जेतेपदं मुंबईकडे आहेत.

वूमन्स प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा डंका आहे. या स्पर्धेची दोन जेतेपदं मुंबईच्या नावावर आहेत. अमेरिकेतल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये मुंबईचं स्थान आहे. संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या आयएल टी२० आणि दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या SA T20 लीगचं एकेक जेतेपद मुंबईच्या ताफ्यात आहे.

टी२०चं छोटं प्रारुप असणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेतही आता मुंबईचं नाव दुमदुमलं आहे. द ओव्हल इथे झालेल्या फायनलमध्ये एमआय लंडन संघाने १८३ धावांची मजल मारली. विल जॅक्सने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. निकोलस पूरनने २८ चेंडूत ५४ धावा करत जॅक्सला चांगली साथ दिली. कर्णधार सॅम करनने २३ धावांची उपयुक्त खेळी केली. मँचेस्टर सुपर जायंट्स संघातर्फे जोश टंग आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मँचेस्टरचा डाव १३८ धावांतच आटोपला. कर्णधार एडन मारक्रमने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. मारक्रमचा अपवाद वगळता मँचेस्टरच्या बाकी फलंदाजांनी शरणागती पत्करली. एमआय संघातर्फे रशीद खानने १७ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स पटकावल्या. रशीदला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.