मुंबई : लय मिळवण्यासाठी झगडणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन लोकप्रिय संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, गुरुवारी आमनेसामने येणार आहेत. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या माजी कर्णधारांच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.

रोहित आणि धोनी या दोघांनाही पायाच्या दुखापतीचा सामना करावा लागला. ४४ वर्षीय धोनी यंदाच्या हंगामात अद्याप एकही सामना खेळलेला नाही. मात्र, गेले दोन दिवस त्याने वानखेडे स्टेडियमवर कसून सराव केला. त्यामुळे तो मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, ३८ वर्षीय रोहित हंगामातील पहिले चार सामने खेळला होता. त्यात तो चांगल्या लयीतही होता. परंतु पायाच्या दुखापतीमुळे त्याला गेल्या दोन सामन्यांना मुकावे लागले. आता तो मुंबई संघात परतण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि चेन्नई हे ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वांत यशस्वी संघ असून त्यांनी प्रत्येकी पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे, मुंबईने रोहितच्या, तर चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखालीच आपली सर्व जेतेपदे मिळवली आहेत. मुंबईने यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयासह केली होती. मात्र, त्यानंतर सलग चार सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली.

गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबईला सूर गवसल्याचे संकेत मिळाले. या सामन्यात मुंबईने ९९ धावांनी बाजी मारत पराभवांची मालिका खंडित केलीच, शिवाय आपली निव्वळ धावगतीही (०.०६७) सुधारली. त्यामुळे आता चेन्नईविरुद्ध घरच्या मैदानावर विजय मिळवल्यास मुंबईचा संघ गुणतालिकेत आणखी वरच्या स्थानी झेप घेऊ शकेल.

मुंबईप्रमाणेच चेन्नईनेही सहापैकी केवळ दोन सामने जिंकले असूून चारमध्ये हार पत्करली आहे. गेल्या सामन्यात चेन्नईचा संघ सनरायजर्स हैदराबादकडून पराभूत झाला. या सामन्यातच प्रतिभावान फलंदाज आयुष म्हात्रेला पायाची दुखापत झाली आणि तो स्पर्धेबाहेर गेला. त्यामुळे चेन्नईची चिंता वाढली आहे. आता अन्य फलंदाजांनी कामगिरी न उंचावल्यास चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान धोक्यात येऊ शकेल.
वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप सूर्यकुमारबाबत चिंता कायम

  • मुंबई इंडियन्सचे तारांकित खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांत अपयशी ठरत होते. मात्र, गेल्या सामन्यात गुजरातविरुद्ध तिलक वर्माने शानदार शतक साकारले, तर जसप्रीत बुमराने हंगामातील पहिला बळी मिळवला.
  • कर्णधार हार्दिक पंड्याही वेळोवेळी योगदान देत आहे. क्विंटन डिकॉकने वानखेडेवरील गेल्या सामन्यात शतक साकारले. नमन धीरनेही प्रभावित केले. त्यातच इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्सचे आगमन झाल्याने मुंबई संघाला बळकटी मिळणार आहे.
  • परंतु मुंबईसाठी अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवची कामगिरी चिंतेचा विषय ठरत आहे. सूर्यकुमारला सहा सामन्यांत २०.१६च्या सरासरीने केवळ १२१ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याने कामगिरी उंचावणे आवश्यक आहे.

चेन्नईची मुंबईकरांवर भिस्त

आयुष म्हात्रे उर्वरित हंगामाला मुकणार आहे. मात्र, चेन्नई संघात सर्फराज खान आणि शिवम दुबे हे अन्य दोन मुंबईकर खेळाडू आहेत. आयुषच्या अनुपस्थितीत सर्फराजला अधिक वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी दुबेवर असेल. त्यामुळे या दोघांचे योगदान चेन्नईसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड सध्या संघर्ष करत आहे. संजू सॅमसनच्या कामगिरीत सातत्य नाही. त्यांनी अधिक जबाबदारी घेऊन खेळणे आवश्यक आहे. गोलंदाजीत अंशुल कंबोजची भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरेल.