IPL 2026 Rohit Sharma Virat Kohli Injured: आयपीएल २०२६ चा २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही संघांच्या स्टार खेळाडूंना दुखापत झाली आहे आणि त्यांना दुखापतीमुळे मैदान सोडावे लागलं. आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरू शकला नाही. दरम्यान, धावांचा पाठलाग करताना फलंदाजी करताना रोहित शर्माला देखील दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर जावं लागलं.
आरसीबीने मुंबई इंडियन्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट व टीम डेव्हिड यांनी वादळी फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली आहे. आरसीबीने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई करत २४० धावांचा डोंगर उभारला आहे. मुंबई इंडियन्सला या ऐतिहासिक विजयासाठी २४१ धावांचं अवघड लक्ष्य गाठावं लागणार आहे.
रो-को ला दुखापत; मुंबई-आरसीबी संघांना मोठा धक्का
समालोचक सायमन डूल यांनी दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे विराट कोहली या सामन्यात दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणासाठी उतरू शकला नाही. दरम्यान, रोहित शर्माला फलंदाजी करताना हॅमस्ट्रिंगवर ताण जाणवला.
पाचव्या षटकात धाव घेताना रोहित शर्मा दुखापत झाली. १३ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि एका चौकारासह १९ धावांवर असताना त्याला दुखापतग्रस्त होऊन मैदान सोडावे लागलं. रोहित शर्माने काही वेळ फिजिओकडून ट्रीटमेंट घेत मैदानावर राहावं लागलं, पण अखेरीस वेदना असह्य होऊ लागल्याने रोहित माघारी परतला. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला आहे. रोहितची दुखापत बरी झाल्यास आणि गरज भासल्यास, हिटमॅन फलंदाजीसाठी परत येऊ शकतो. तो नाबाद होता, पण दुखापतग्रस्त होऊन मैदान सोडलं.
विराट कोहलीची दुखापत आरसीबीसाठी एक मोठा धक्का आहे. विराट कोहली या हंगामात आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत चार सामने खेळले असून, त्या चारही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. आयपीएल २०२६ मध्ये, कोहलीने चार सामन्यांमध्ये ५९.६६ च्या सरासरीने १७९ धावा केल्या असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ६९ आहे. विराटने या सामन्यात मुंबई इंडियन्सविरूद्ध अर्धशतक झळकावलं. यासह मुंबई इंडियन्सविरूद्ध १ हजार धावा करणारा तो आयपीएलमधील पहिला फलंदाज ठरला आहे.
