कुटुंब रंगलंय काव्यात या नावाचा कलाविष्कार मराठी रंगभूमीवर सादर होत असे. त्याच धर्तीवर भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडचा कर्णधार मायकेल ब्रेसवेलच्या कुटुंबाची कहाणी कुटुंब रंगलंय क्रिकेटमध्ये अशी आहे. नियमित कर्णधार मिचेल सँटनर दुखापतीतून न सावरल्याने न्यूझीलंडच्या निवडसमितीने ३४वर्षीय मायकेल ब्रेसवेलकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला.
मायकेलचे काका ब्रेंडन ब्रेसवेल यांनी ६ कसोटीत न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं. ८०च्या दशकात ते न्यूझीलंडसाठी खेळले. मायकेलचे दुसरे काका जॉन ब्रेसवेल हे क्रिकेटविश्वातल्या निष्णात प्रशिक्षकांपैकी एक आहेत. ४१ कसोटी आणि ५३ वनडेत त्यांनी न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं. फिरकीपटू जॉन यांनी कसोटीत न्यूझीलंडसाठी शंभरपेक्षा जास्त विकेट्स पटकावल्या. सामन्यात १० विकेट्स पटकावणारे ते न्यूझीलंडचे पहिले फिरकीपटू ठरले. निवृत्तीनंतर ते इंग्लंडमधील काऊंटी संघ ग्लुस्टरशायर संघासाठीही खेळले. निवृत्तीनंतर जॉन यांनी न्यूझीलंड संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलं. न्यूझीलंड संघाला मुख्य संघांच्या बरोबरीने आणण्यात आणि विजयपथावर ठेवण्याच जॉन यांचा मोलाचा वाटा आहे.
मायकेलचे आणखी एक काका डग्लस ब्रेसवेल यांनी न्यूझीलंडमधल्या कँटरबरी आणि सेंट्रल डिस्ट्रीक्ट संघांचं प्रतिनिधित्व केलं. पण ते न्यूझीलंडसाठी खेळू शकले नाहीत. मायकेलचे बाबा मार्क ब्रेसवेल हे न्यूझीलंडसाठी खेळू शकले नाहीत. पण ते फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. बाबा-काका यांच्याकडून मिळालेला वारसा जपत मायकेलनेही क्रिकेटमध्येच कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला.
काही दिवसांपूर्वीच मायकेलचा भाऊ डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. २८ कसोटी, २१ वनडे आणि २० टी२० सामन्यात डगने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं. दुखापतींच्या ससेमिऱ्यात अडकल्याने डगला नियमितपणे खेळता आलं नाही. २००१ मध्ये न्यूझीलंडने २६ वर्षानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकली. त्यात डगचा सिंहाचा वाटा होता.
तब्बल १० वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट खेळल्यानंतर मायकेलला न्यूझीलंडचे दरवाजे उघडले. ३१व्या वर्षी नेदरलँड्सविरुद्ध मायकेलला न्यूझीलंडची कॅप देण्यात आली. वेलिंग्टनसाठी खेळताना ६५ चेंडूत १४१ धावांची वादळी खेळी मायकेलसाठी निर्णायक ठरली. आयर्लंडविरुद्ध खेळताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८२ चेंडूत १२७ धावांची तडाखेबंद खेळी केली. या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने १२०/५ अशा स्थितीतून ३०१ धावांचा यशस्वी पाठलाग केला. मायकेलने करिअरची सुरुवात विकेटकीपर बॅट्समन म्हणून केली होती. पण हळूहळू त्याने ऑफस्पिन फिरकीपटू आणि फटकेबाजी करणारा उपयुक्त फलंदाज अशी ओळख प्रस्थापित केली. त्याने दुसऱ्या टी२० सामन्यात हॅटट्रिक घेतली. २०२३ मध्ये भारत दौऱ्यावर असताना न्यूझीलंडचा संघ साडेतीनशेचा धावांचा पाठलाग करत होता. त्यांची अवस्था ११०/५ अशी होती. मायकेलने या स्थितीतून संघाला संकटातून बाहेर काढलं. त्याने ७८ चेंडूत १४० धावांची तडाखेबंद खेळी साकारली. न्यूझीलंडने १३ धावांनी सामना गमावला पण मायकेलने चाहत्यांची मनं जिंकली.
या खेळीचा परिणाम म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मायकेलला ताफ्यात समाविष्ट केलं. मात्र त्याला फारशी संधीच मिळाली नाही. त्याचवर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. न्यूझीलंडला अष्टपैलू खेळाडूंची मोठी परंपरा लाभली आहे. ख्रिस केर्न्स, ख्रिस हॅरिस, स्कॉट स्टायरिस, जेकब ओरम, डॅनियल व्हेटोरी यांच्या पंक्तीत मायकेलने स्थान पटकावलं. न्यूझीलंडमधल्या खेळपट्टया फिरकीला पोषत नसल्याने मायकेलला अंतिम अकरात खेळण्याची संधी अभावानेच मिळते. भारतीय उपखंडात मायकेलला आपलं कौशल्य सिद्ध करण्याची सिद्ध मिळते.
