Michael Bracewell declines New Zealand central contract: न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मायकल ब्रेसवेल याने आपल्या कारकिर्दीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३५ वर्षीय ब्रेसवेल हा २०२६-२७ हंगामासाठी न्यूझीलंड क्रिकेटच्या ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’चा भाग असणार नाही. न्यूझीलंड क्रिकेटच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून माघार घेणारा मायकेल ब्रेसवेल हा सहावा खेळाडू ठरला आहे.
अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलने २०२६-२७ हंगामासाठी न्यूझीलंड क्रिकेटबरोबरचा केंद्रीय करार न स्वीकारता ‘कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये (BBL) खेळण्यासाठी ब्रेसवेलने हा निर्णय घेतल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेटने सोमवारी दिली.न्यूझीलंड क्रिकेटने ५ ऑक्टोबर रोजी याची घोषणा केली.
न्यूझीलंड क्रिकेटने सांगितलं की, ३५ वर्षीय ब्रेसवेलच्या जागी नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सचा फलंदाज आणि माजी वेलिंग्टन फायरबर्ड्सचा कर्णधार निक केली न्यूझीलंड क्रिकेट संघातील सहाव्या खेळाडूने आता सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून नाव काढून घेतलं आहे.याला केंद्रीय कराराच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी केली याला पहिल्यांदाच राष्ट्रीय करार मिळाला आहे. यापूर्वी महिनाभरापूर्वी मार्क चॅपमननेही न्यूझीलंडचा केंद्रीय करार न स्वीकारता असाच निर्णय घेतला होता. फिन अॅलन, लॉकी फर्ग्युसन, अॅडम मिल्ने आणि टिम सेफर्ट या स्टार खेळाडूंनीही २०२६-२७ हंगामासाठी केंद्रीय करारातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ब्रेसवेल भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवडीसाठी उपलब्ध राहणार आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील या महत्त्वाच्या मालिकेला २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच टी-२० सामन्यांसोबतच तीन वनडे आणि दोन कसोटी सामनेही खेळवले जाणार आहेत.
मायकेल ब्रेसवेलने आपल्या निर्णयाबाबत म्हटलं, “माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर ही संधी स्वीकारण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेटकडून मिळालेला पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी आता फक्त व्हाइट-बॉल क्रिकेट खेळतो आणि ही संधी सोडणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी अजूनही ब्लॅककॅप्ससाठी खेळण्याकरता पूर्णपणे कटिबद्ध आहे. भारताच्या आगामी दौऱ्यात आणि त्यानंतरच्या व्हाइट-बॉल मालिकांमध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे. पुढील उन्हाळ्यापासून सुरू होणाऱ्या पहिल्या NZ20 स्पर्धेत खेळण्याची संधी मिळवण्याकडेही माझं लक्ष आहे,” असं ब्रेसवेलने सांगितलं.
दरम्यान, न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी निक केलीला केंद्रीय करार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ३३ वर्षीय निक केलीने न्यूझीलंडकडून आठ वनडे आणि सात टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
