क्रिकेटपटू जितके त्यांच्या मैदानावरील कामगिरीसाठी चर्चेत असतात तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींसाठी चर्चेमध्ये असतात. नुकताच ऑस्ट्रेलियाचा एक माजी कर्णधार त्याच्या खासगी आयुष्यातील मोठ्या घडामोडीसाठी चर्चेत आलाय. ऑस्ट्रेलियाला विश्वकप जिंकून देणारा मायकल क्लार्क सध्या चर्चेत आलाय त्याच्या महागड्या घटस्फोटासाठी. क्लार्कने आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असला तरी या घटस्फोटाची आर्थिक बाजू आता समोर आल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायकल क्लार्कने लग्नानंतर सात वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. क्लार्क आणि त्याची पत्नी काइली यांचा २०१२ साली विवाह झाला होता. क्लार्क आणि काइली हे २०१२ पासून एकत्र होतं. १८ महिने ते एकमेकांना डेट करत होते. क्लार्क आणि काइली हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट सर्कलमधील एक नावाजलेलं कपल म्हणून ओळख निर्माण केलेली. दोघांना लग्नानंतर एक मुलगीही झाली. केल्सी नावाची ही मुलगी आता चार वर्षांची आहे. मात्र वैचारिक मदतभेद आणि काही विषयांवरुन झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

मात्र सात वर्ष अगदी गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या जोडप्याने अचानक घटस्फोट का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला असला तरी या घटस्फोटामागील एक मोठं कारण ठरलं एक प्रेम प्रकरण. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मायकल क्लार्क आणि त्याची असिस्टंट यांचं प्रेम प्रकरण सुरु होतं. क्लार्कच्या असिस्टंटचं नाव साशा असं होतं. साशा ही मायकल क्लार्कच्या क्रिकेट अकादमीचा कारभार संभाळायची. मात्र अनेकदा या दोघांना एकत्र पाहण्यात आलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> आधी पत्नीशी घटस्फोट नंतर प्रेयसीसोबत ब्रेकअप, आता ‘बॅचलर्स’ राहण्यासाठी क्लार्कने घेतलं ७० कोटींचं 5BHK घर

साशासोबतच्या या कथित प्रेमप्रकरणामुळे क्लार्क अगदीच प्रकाशझोतात आला जेव्हा या दोघांचे काही खासगी फोटो सोशल मीडियावरुन समोर आले. या फोटोंमध्ये क्लार्क आणि साशा एका खासगी लक्झरी यॉटवर एकमेकांच्या बाजूला झोपलेले दिसत आहेत. या फोटोमुळे क्लार्कच्या संसारामध्ये वादाची मोठी ठिणगी पडली. हे फोटो व्हायरल झाले होते तेव्हा क्लार्कने याबद्दल कोणतंही भाष्य केलं नव्हतं. मात्र त्यानंतर काही कालावधीमध्येच काइली आणि क्लार्क या दोघांनी वेगळं होण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्याने फोटोंसंदर्भात प्रसारमाध्यमांनी केलेला दावा खरा असल्याचे संकेत मिळाले.

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार क्लार्क आणि काइलीदरम्यान झालेला घटस्फोटामध्ये पोटगीसंदर्भात निश्चित करण्यात आलेला आकडा हा ४० मिलियन डॉलर्स म्हणजेच ३०० कोटी रुपयांचा आहे. घटस्फोटानंतर दोघांनीही आपआपले वेगळे मार्ग निवडले आहेत. घटस्फोटानंतर क्लार्कने नवीन घरं घेतलं आणि काइली ही क्लार्कसोबत ज्या घरामध्ये लग्नानंतर राहत होती ते घरंही या दोघींनी विकलंय.

क्लार्कने २०२१ साली सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये एक घर १३ मिलियन डॉलर्स म्हणजेच ७० कोटींना विकत घेतलं आहे. एका लिलावामध्ये क्लार्कने हे फाइव्ह बीएचकेचं हे बॅचलर पॅड विकत घेतलं आहे. क्लार्कच्या नव्या घरामध्ये पाच मोठ्या आकाराच्या रुम असून हे घर पूर्णपणे युरोपियन स्टाइलने बनवण्यात आलं आहे. क्लार्कचं नवीन घर हे फिट्जविलियम मेन्शनपासून केवळ एक घर सोडून आहे. फिट्जविलियम मेन्शन हा क्लार्कचा जुना पत्ता आहे. त्या घरामध्ये तो त्याची पूर्वाश्रमीची पत्नी काइलीसोबत राहत होता. क्लार्क आणि काइलीने ते घर फेब्रुवारीमध्ये १२ मिलियन डॉलर्सला विकलं. क्लार्क आणि काइली २०१४ पासून २०१९ पर्यंत त्या घरामध्ये राहत होते. २०१४ मध्ये क्लार्क आणि काइलीने ते घर ८.३ मिलियन डॉलर्सला विकत घेतलं होतं. २०१९ मध्ये क्लार्क आणि काइली यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ वर्षभर ही प्रक्रिया सुरु होती. काइलीनंतरही क्लार्कच्या आयुष्यात एक तरुणी होती. मागील वर्षाच्या सुरुवातीला क्लार्क आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर असणाऱ्या पीप एडवर्ड्सचं ब्रेकअप झालं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Michael clarke and his wife most expensive divorce of cricket history 300 crores scsg
First published on: 19-01-2022 at 09:50 IST