भारताविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी मायकेल क्लार्कचा सल्ला

चेंडू फेरफार प्रकरणामुळे डागाळलेल्या प्रतिमेला सुधारण्यासाठी चांगलेपणाचा आव आणून खेळल्यास काहीही फायदा होणार नाही. उलट भारताविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी आणखी निष्ठुर व कठोरतेने खेळा, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू मायकेल क्लार्कने बुधवारी ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना सुनावले.

मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटीत बँक्राफ्ट यांना कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमरून चेंडू फेरफारप्रकरणी दोषी आढळल्यामुळे एक वर्ष निलंबनाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटची कामगिरी खालावलेलीच आहे.

याविषयी क्लार्क म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटची खरी ओळख ही त्यांच्या निर्धास्त स्वभामामुळे आहे. तुमचा कोणी आदर करो अथवा न करो. तसेच समोरील खेळाडू किंवा प्रेक्षक तुमच्याबाबतीत काय विचार करतील, याचा विचार सोडून द्या.’’

‘‘देशातील चाहत्यांना फक्त विजय हवा असतो आणि भारताविरुद्ध तुम्ही सोज्वळपणाचे क्रिकेट खेळून विजय मिळवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कठोर होऊनच खेळावे लागले. अन्यथा तुम्हाला संपूर्ण जगभरातील चाहत्यांचे प्रेम नक्की मिळेल, मात्र विजय कधीच मिळवता येणार नाही,’’ असे क्लार्कने सांगितले.

चेंडू फेरफार प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील २४ पैकी एकूण १७ आंतरराष्ट्रीय सामने गमावले असून पुढील आठवडय़ात भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठीदेखील त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.