Michael Vaughan controversial Statement: भारताने टी-२० विश्वचषक २०२६चं जेतेपद पटकावलं. या स्पर्धेतील गट टप्प्यातील सर्व सामने भारताने जिंकले होते. पण सुपर-८ टप्प्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा पराभव केला. यानंतर वेस्ट इंडिजच्या मोठ्या विजयामुळे भारतीय संघ सुपर-८ टप्प्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर होता. पण द. आफ्रिकेविरूद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाने संघात बदल केला आणि थेट टी-२० विश्वचषकाचं जेतेपद आपल्या नावे केला. यानंतर इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल वॉ दक्षिण आफ्रिकेवर संतापत त्यांच्यामुळे भारतीय संघ स्पर्धेत पुढे जाऊ शकल्याचं त्यांनी म्हटलं.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉ त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. आता, टी-२० विश्वचषकानंतर, त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेला २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील सर्वात मूर्ख संघ म्हटलं आहे. त्यांचं मत आहे की भारताला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकायला नको होतं.
मायकेल वॉच्या वक्तव्यावरून असं दिसून येतं की तो दक्षिण आफ्रिकेपेक्षा उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला हरवलं याबद्दल जास्त नाराज आहे. मायकल वॉच्या मते स्पर्धा जिंकण्यासाठी, सर्वोत्तम खेळण्यापूर्वी सर्वोत्तम संघाला बाद करणं आवश्यक आहे. ही मानसिकता त्यांचं वक्तव्य किती विचित्र आहे हे अधोरेखित करते.
वेस्ट इंडिजवर विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेमुळे भारतीय संघ स्पर्धेत कायम राहिला. जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवलं असतं तर शेवटचे दोन सामने जिंकूनही टीम इंडिया सुपर-८ मधून बाहेर पडू शकली असती. त्याऐवजी, दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवलं आणि टीम इंडियाने शेवटचे दोन सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. अशा प्रकारे, दक्षिण आफ्रिका आणि भारताने त्यांचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित केलं.
‘स्टिक टू क्रिकेट’ या इंग्रजी पॉडकास्टवर बोलताना मायकेल वॉने हे विचित्र वक्तव्य केलं. तो म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो, या स्पर्धेत सर्वात मूर्ख संघ कोणता होता? दक्षिण आफ्रिका. कारण जर दक्षिण आफ्रिकेने सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजला जिंकू दिलं असतं तर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला असता. मी फक्त एवढंच म्हणत आहे की जर त्यांना (भारत) स्पर्धेबाहेर केलं असतं तर त्यांना थांबवता आलं असतं. दक्षिण आफ्रिकेने तो सामना जिंकून त्यांना संधी दिली.”
वॉ पुढे म्हणाले, “नंतर भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि नंतर इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेविरुद्ध त्यांच्या तीन प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. पाहा म्हणजे, हे सर्व अचानक घडतं.मला फक्त एवढेच म्हणायचं आहे की जर तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर सर्वोत्तम संघाला स्पर्धेबाहेर काढणं हा सर्वोत्तम मार्ग आहे.”
