आयपीएल २०२१ मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघ बाहेर पडल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने बंगळुरुचा ४ गडी राखून पराभव केला. यासह विराटच्या आयपीएल जेतेपदाच्या स्वप्नाला पुन्हा एकदा सुरूंग लागला.

वॉनने क्रिकबझवर सांगितले, ”कसोटी कर्णधार म्हणून विराटचे यश नाकारता येणार नाही. त्याने भारतीय संघ विकसित केला आहे, ज्याला हुशार म्हटले जाईल. पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगावे लागेल, की रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. यात तो खूप मागे राहिला आहे.”

हेही वाचा – IPL 2021 : …अन् डिव्हिलियर्ससह विराटही रडू लागला!; पाहा व्हायरल झालेला VIDEO

”आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून त्याचा वारसा असा असेल, की तो संघाला एकदाही चॅम्पियन बनवू शकला नाही. आरसीबी संघात त्याच्याकडे जागतिक दर्जाचे खेळाडू होते. तुम्हाला हे समजले पाहिजे की उच्च स्तरीय खेळात तुम्हाला संघासाठी करंडक जिंकण्यासाठी त्या मर्यादेच्या पलीकडे जावे लागेल. आयपीएलमध्ये तो स्वत: ला एक अपयशी कर्णधार म्हणून बघेल. कारण त्याच्या खेळाची पातळी खूप उच्च आहे आणि त्याला नेहमी स्वतःला जिंकताना बघायचे असते”, असेही वॉनने म्हटले.

कप्तान म्हणून विराट…

२०१३ मध्ये कोहली आरसीबीचा पूर्णवेळ कर्णधार बनला. या भूमिकेत त्याने १४० सामन्यांमध्ये ६६ वेळा विजय मिळवला. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आयपीएल २०१६ ची अंतिम लढत खेळली. आयपीएलचे शेवटचे दोन हंगामही आरसीबीसाठी चांगले राहिले आहेत. आरसीबीने दोन्ही प्रसंगी विराटच्या नेतृत्वाखाली प्लेऑफ गाठली आहे. पण कर्णधार म्हणून आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण ठरले.