नोकरीचा प्रश्न सुटण्याची शरीरसौष्ठवपटू सुजन पिळणकरला आशा

अन्वय सावंत, लोकसत्ता

मुंबई : वरळीमधील गिरणी कामगाराचा मुलगा सुजन पिळणकरने आर्थिक चणचणीचा सामना करताना आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पदककमाई केली. नुकत्याच उझबेकिस्तानातील ताश्कंद येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्याने आता सरकारी नोकरीचा प्रश्न सुटेल, अशी आशा सुजनने व्यक्त केली.

२०१८मध्ये ‘मुंबई-श्री’चा किताब जिंकणाऱ्या सुजनने ‘महाराष्ट्र-श्री’ या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. मात्र, यंदा त्याला प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने ९० किलो वजनी गटात रुपेरी यश संपादन केले. ‘‘मध्यमवर्गीय घरातील मुलाला शरीरसौष्ठव खेळात प्रगती करणे सोपे नाही. माझे वडील गिरणी कामगार होते. त्यामुळे आर्थिक गणिते अवघड होती. मात्र, कुटुंबीयांचा मला नेहमीच पाठिंबा लाभला. माझा भाऊ वेळोवेळी आर्थिक मदत करतो. व्यायामशाळेत मार्गदर्शकाचे काम करून मी शरीरसौष्ठवासाठी पैसे उभे करतो. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याचे माझे ध्येय आहे. परंतु त्यासाठी आंतरराष्ट्रीय पदक जिंकणे गरजेचे असल्याने मी जिद्दीने माझ्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली,’’ असे सुजन म्हणाला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे देशभरातील व्यायामशाळा बंद होत्या. सुजनने २०१९मध्ये परळ येथे स्वत:ची व्यायामशाळा सुरू केली होती. परंतु करोनाकाळात त्याला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. ‘‘व्यायामशाळा बंद ठेवावी लागली. मात्र, त्यासाठी घेतलेल्या जागेचे भाडे, कर्जाचे हप्ते हे भरावे लागत होते,’’ असे सुजनने सांगितले. जागतिक स्पर्धेसाठी ताश्कंद येथे त्याला स्वखर्चाने जावे लागले. तिथे निवास, प्रवास आणि व्हिसा आदीची सोयही स्वत:च करावी लागली. ‘‘मी आंतरराष्ट्रीय पदकाचे उद्दिष्ट समोर ठेवून मेहनत करत राहिलो आणि त्याचेच मला फळ मिळाले. आता नोकरी मिळाल्यास याहूनही मोठा पल्ला गाठू शकेन,’’ असे सुजनने नमूद केले.

भारताची २२ पदकांची लयलूट

यंदा जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेतील विविध गटांत भारताने पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य अशी एकूण २२ पदके पटकावली.  यात महाराष्ट्राच्या सुजनने रौप्य, तर अखिल भारतीय पोलिसांच्या सुभाष पुजारीने (४० ते ४९ वयोगटातील ८० किलोपर्यंत वजनी गट) कांस्यपदक मिळवले, अशी माहिती भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी दिली.