आजपासून दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सामना थोडा उशिराने सुरु झाला. भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाऊस झाल्याने षटकांची संख्या कमी करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही संघ प्रत्येकी ४०-४० षटके खेळणार आहेत. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २४९ धावा धावफलकावर लावल्या.

या मालिकेत टीम इंडियाची कमान शिखर धवनच्या हाती आहे, तर अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या मालिकेत दक्षिण आफ्रिका आपल्या मुख्य संघासोबत खेळत आहे. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी जानेमन मलान व क्विंटन डी कॉक यांनी ४९ धावांची सलामी दिली. मलान बाद झाल्यानंतर कर्णधार टेंबा बवुमाही फारसा टिकू शकला नाही. ऐडन मार्करम खातेही न उघडता तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने सलामीवीर डी कॉक याने डाव सावरून धरला होता. रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी त्याने ५४ चेंडूवर ४८ धावांची खेळी केली.

चार गडी बाद झाल्यानंतर आफ्रिकन संघाने शानदार पुनरागमन केले. डी कॉक बाद झाल्यानंतर अनुभवी डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन यांनी डावाची सूत्रे हाती घेत भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. खराब चेंडूंचा समाचार घेत तसेच एकेरी-दुहेरी धावाही काढल्या. हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी पाचव्या गड्यासाठी १३४ धावांची भागीदारी केली आहे. क्लासेनने ६५ चेंडूत ७४ धावा केल्या तर मिलरने ६३ चेंडूत ७५ धावा केल्या आणि हे दोघेही नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा खूप फायदा झाला. मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई या दोघांनी आवेश खानच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरचे एकापाठोपाठ एक झेल सोडले.

अखेरच्या षटकांत मिलर व क्लासेन यांनी फटकेबाजीला सुरुवात केली, अशात ऋतुराज गायकवाडने मिलरचा झेल टिपण्या साठी सर्वस्व पणाला लावले पण त्याला अपयश आले. रवी बिश्नोई महागडा गोलंदाज ठरला, भारताला आता सामना जिंकण्यासाठी चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन करणे आवश्यक आहे.