आयपीएल लिलावात खेळाडूंसाठी कोटीच्या कोटी रुपयांच्या बोली लागतात. चांगला खेळाडू आपल्या ताफ्यात असावा असं प्रत्येक संघाला वाटतं त्यामुळे दर्जेदार खेळाडूसाठी प्रचंड चुरस पाहायला मिळते. अनेक संघ एखाद्या खेळाडूसाठी सगळी तिजोरीच जणू रिकामी करतात. लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंची त्याच हंगामात कामगिरी कशी होते? प्रचंड अशा मानधनाचं त्यांना दडपण येतं का? जाणून घेऊया आयपीएलच्या इतिहासाच प्रत्येक लिलावात सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू आणि त्यांची त्या हंगामातली कामगिरी.

२०२६- कॅमेरुन ग्रीन

यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात चर्चित मुद्दा म्हणजे कॅमेरुन ग्रीन. कोलकाताच्या सलामीच्या लढतीत अष्टपैलू ग्रीनने गोलंदाजी केली नाही. त्यासंदर्भात कर्णधार अजिंक्य रहाणेला विचारण्यात आलं. ग्रीन केव्हा गोलंदाजी करू शकेल याचं उत्तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया देऊ शकेल असं रहाणेने सांगितलं. अष्टपैलू ग्रीनला सातत्याने विविध दुखापतींनी सतावलं आहे. दुखापतींमुळेच ऑस्ट्रेलियासाठी तो अनेक सामने खेळू शकला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या रिहॅब प्रक्रियेचा तो भाग आहे. रहाणेच्या वक्तव्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तात्काळ प्रतिक्रिया दिली. ग्रीन आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात गोलंदाजी करू शकणार नाही याची कल्पना कोलकाता संघव्यवस्थापनाला देण्यात आल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं. ग्रीनसाठी कोलकाताने तब्बल २५.२ कोटी रुपये खर्च केले होते. विदेशी खेळाडूला मिळालेलं हे सर्वाधिक मानधन आहे. अष्टपैलू आंद्रे रसेलने निवृत्ती घेतल्यामुळे कोलकाताला सक्षम अष्टपैलू खेळाडूची गरज होती. म्हणूनच त्यांनी लिलावात कॅमेरुन ग्रीनवर ताफ्यात घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला.प्रचंड अशा मानधनामुळे ग्रीनकडून अपेक्षाही वाढल्या. मात्र तो अद्याप पूर्णपणे फिट नाही. त्याने गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे पण पूर्ण हंगाम करू शकेल याबाबत साशंकता आहे. ग्रीनला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे कोलकाताने याच्यासाठी एवढे पैसे का मोजले अशी कडाडून टीका होत आहे. कोलकाताची पराभवाची मालिका थांबत नसल्याने टीकेची तीव्रता वाढली आहे.

२०२५- ऋषभ पंत

के.एल.राहुलला रिलीज केल्यानंतर लखनौ सुपरजायंट्सला कर्णधाराची गरज होती. विकेटकीपर आणि धडाकेबाज बॅट्समन ऋषभ पंतसाठी त्यांनी तब्बल २७ कोटी रुपये मोजले. आयपीएलच्या इतिहासातला तो सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. लिलावात काही मिनिटांपूर्वी पंजाबने श्रेयस अय्यरसाठी २६.७५ कोटींची बोली लावून त्याला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. ऋषभ आणि लखनौनं, श्रेयस आणि पंजाबला टाकत नवा विक्रम रचला. ऋषभला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने हंगामात २६९ धावा केल्या. लखनौ सुपरजायंट्सची कामगिरीही यथातथाच राहिली.

२०२४- मिचेल स्टार्क

आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा मिचेल स्टार्क हे कोणत्याही संघासाठी हुकूमी अस्त्र ठरू शकतो. डावाच्या सुरुवातीलाच दणादण विकेट्स घेणारा स्टार्क आपल्या संघाचा आधारवड होऊ शकतो असं कोलकाता संघव्यवस्थापनाला वाटलं. टेस्ट, वनडे, टी२० तिन्ही प्रकारात स्टार्कने कर्तृत्व सिद्ध केलं आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये तसंच मोठ्या सामन्यांमध्ये स्टार्क हमखास विकेट्स पटकावतो. हे सगळं लक्षात घेऊन कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्टार्कसाठी २४.७५ कोटी रुपये खर्च केले. सुरुवातीच्या सामन्यात स्टार्कला फलंदाजांचा तडाखा बसला. सगळा अनुभव पणाला लावत स्टार्कने पुनरागमन केलं. प्लेऑफ्समध्ये स्टार्कने खणखणीत कामगिरी केली. क्वालिफायर १ आणि फायनलच्या मुकाबल्यात स्टार्कने सामनावीर पुरस्कार पटकावला. स्टार्कने संघाचा विश्वास सार्थ ठरवला.

२०२३- सॅम करन

मिनी ऑक्शनमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन अव्वल लाभार्थी ठरला. पंजाब किंग्जने त्याच्यासाठी तब्बल १८.५० कोटी रुपये खर्च केले. सॅमला संघात घेण्यासाठी पाच अन्य संघांना मागे टाकत पंजाबने बाजी मारली. सॅमकडून पंजाबला खूप अपेक्षा होत्या मात्र तो लौकिकाला जागू शकला नाही. जगभरातल्या विविध टी२० लीगमध्ये नियमितपणे खेळणाऱ्या सॅमने त्या हंगामात २७६ धावा केल्या आणि १० विकेट्स पटकाल्या.

२०२२- इशान किशन

मुंबई इंडियन्स संघाने युवा धडाकेबाज फलंदाज इशान किशनसाठी १५.२५ कोटींची जोरदार बोली लावली. इशान किशनसाठी पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबा असे अनेक संघ आतूर होते. मात्र मुंबईला इशान हवाच होता.इशानने ४१८ धावा फटकावत मुंबई संघव्यवस्थापनाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला.

२०२१- ख्रिस मॉरिस

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा दबदबा नसलेल्या ख्रिस मॉरिससाठी १६.२५ कोटी एवढी बोली लागली तेव्हा क्रिकेटरसिकांना प्रचंड धक्का बसला. मॉरिसला मोठ्या मानधनाचं दडपण पेलवलं नाही. त्याला हंगामात १५ विकेट्सच घेता आल्या.

२०२०- पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्ससाठी कोलकाताने प्रचंड पैसा ओतला. मात्र कमिन्स हंगामात १२ विकेट्स घेऊ शकला.

२०१९- जयदेव उनाडकत

डोमेस्टिक क्रिकेटचा आणि आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या जयदेव उनाडकतसाठी राजस्थान रॉयल्सने ८.४ कोटी रुपये मोजले. बॅक ऑफ द हँड, स्लोअरवन, कटर अशी अस्त्रं भात्यात असणाऱ्या जयदेवसाठी हा हंगाम फारसा बरा गेला नाही. त्याने फक्त १० विकेट्स घेतल्या.

२०१८- बेन स्टोक्स

एकहाती सामना फिरवण्याची ताकद असलेल्या अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी राजस्थान रॉयल्सने १२.५ कोटी रुपये खर्च केले. पण स्टोक्स लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याने १९६ धावा केल्या आणि ८ विकेट्स घेतल्या.

२०१७- बेन स्टोक्स

रायझिंग पुणे सुपरजायंट्स या नव्या संघाने अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी तब्बल १४.५ कोटी रुपये मोजले. ३१६ धावा आणि १२ विकेट्ससह स्टोक्सच्या संघाचा विश्वास सार्थ ठरवला.

२०१६- शेन वॉटसन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अष्टपैलू शेन वॉटसनसाठी ९.५ कोटी रुपये खर्च केले. महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होणारा वॉटसन दुखापतींच्या ससेमिऱ्यात असे. त्या हंगामात वॉटसन बॅटने मोठी चमक दाखवू शकला नाही पण गोलंदाजीत त्याने स्वतला सिद्ध केलं. त्याने २० विकेट्स घेतल्या.

२०१५- युवराज सिंग

दिल्लीने युवराजसाठी १६ कोटी एवढी प्रचंड रक्कम खर्च केली. २०११ वनडे वर्ल्डकप विजयाचा शिल्पकार, सहा चेंडूत सहा षटकारांचा विक्रम नावावर असणारा आणि सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत युवराजचं नाव अग्रणी आहे. मात्र युवराज लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याला २४८ धावाच करता आल्या.

२०१४- युवराज सिंग

वर्षभरापूर्वी झालेल्या लिलावात युवराज सिंगसाठी बंगळुरूने १४ कोटी रुपये खर्च केले. ३७६ धावा आणि ५ विकेट्स या कामगिरीसह युवराजने स्वतमधलं क्रिकेट संपलं नसल्याचं दाखवून दिलं.

२०१३- ग्लेन मॅक्सवेल

मुंबई इंडियन्सने मॅक्सवेलसाठी ५.३ कोटी रुपये दिले पण त्याला मर्यादितच संधी मिळाल्या. त्याने फक्त ३६ धावा केल्या.

२०१२- रवींद्र जडेजा

चेन्नई सुपर किंग्सने अष्टपैलू रवींद्र जडेजाला संघात समाविष्ट करण्यासाठी ९.८ कोटी एवढी मोठी रक्कम खर्च केली. चेन्नईच्या संथ आणि धीम्या खेळपट्टीवर जडेजाची फिरकी उपयुक्त ठरेल असा विश्वास चेन्नईने दाखवला. १२ विकेट्स आणि १९१ धावांसह जडेजाने हा विश्वास सार्थ ठरवला. चेन्नई आणि जडेजा हा ऋणानुबंध वर्षानुवर्ष चालला.

२०११- गौतम गंभीर

सौरव गांगुली बाजूला झाल्यानंतर कोलकाताने संघाची धुरा गौतम गंभीरकडे सोपवली. त्यासाठी त्यांनी एवढी ११.०४ कोटी एवढी रक्कम मोजली. ३७८ धावा करत गंभीरने फलंदाज म्हणून सिद्ध केलं. गंभीरच्या नेतृत्वातच कोलकाताने दोन जेतेपदांवर नाव कोरलं.

२०१०-शेन बॉँड, कायरेन पोलार्ड

कोलकाताने वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड तर मुंबईने कायरेन पोलार्डसाठी प्रत्येकी ३.४२ कोटी एवढी रक्कम अदा केली. दुखापतींचं ग्रहण असणाऱ्या बॉन्डने ९ विकेट्स घेतल्या तर पोलार्डने २७३ धावा आणि १५ विकेट्स घेत दणदणीत कामगिरी केली. पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाचा आधारवड झाला. पोलार्ड आयपीएल स्पर्धेत फक्त मुंबई इंडियन्स संघासाठीच खेळला.

२००९- केव्हिन पीटरसन आणि अँड्यू फ्लिनटॉफ

आरसीबीने स्टायलिश फलंदाज केव्हिन पीटरसनसाठी तर चेन्नईने अष्टपैलू फ्लिनटॉफरता प्रत्येकी ७.५ कोटी एवढे पैसे दिले. पीटरसनला संपूर्ण हंगामात फक्त ९३ धावाच करता आल्या. फ्लिनटॉफने ६२ धावा केल्या आणि २ विकेट्स घेतल्या.

२००८- महेंद्रसिंग धोनी

पहिल्यावहिल्या हंगामात महेंद्रसिंग धोनीसाठी सगळ्यात मोठी बोली लागली. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिलावहिला टी२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे धोनीला संघात घेण्यासाठी सगळेच संघ आतूर होते. मात्र चेन्नईने ६ कोटी रुपये खर्चून धोनीला ताफ्यात समाविष्ट केलं. पुढे जे घडलं ते सगळ्यांसमोर आहे.