दुखापतीमुळे माघार घेण्याची प्रशिक्षक विजय शर्मा यांची सूचना नवी दिल्ली : विश्वविजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमधील सहभागापुढे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्षांच्या उत्तरार्धात होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्याच्या दृष्टिकोनातून मीराबाईने जकार्ताच्या स्पर्धेमधून माघार घ्यावी, अशी सूचना भारताचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाईला मे महिन्यापासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. त्यामुळेच तिला अद्याप वेटलिफ्टिंगच्या सरावाला सुरुवात करता आलेली नाही. ‘‘मी संघटनेकडे यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. आता त्यांनीच निर्णय घ्यावा. उपलब्ध असलेल्या कमी कालावधीत तिने सरावाचे दडपण घेऊ नये असे माझे मत आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचे आव्हान काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेपेक्षा ते महत्त्वाचे आहे,’’ असे शर्मा यांनी सांगितले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, ती यंदाच्या वर्षांतील पहिली ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा असेल.