Mirabai Chanu Finishes Fourth: कुस्तीपटू विनेश फोगट फक्त १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीआधीच अपात्र ठरली आणि भारताला निश्चित झालेल्या पदकावर पाणी सोडावं लागलं. त्यापाठोपाठ वेटलिफ्टिंगमध्ये आशा असलेल्या मीराबाई चानूलाही कांस्यपदकानं हुलकावणी दिली आहे. अवघ्या एक किलोच्या फरकानं मीराबाई चानूला हार पत्करावी लागल्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या. त्यामुळे भारताच्या पदकस्वप्नपूर्तीच्या वाटेत वजनांचा खेळ अजूनही चालूच असल्याचं दिसत आहे.

मीराबाई चानूकडून वेटलिफ्टिंग प्रकारात पदकाच्या मोठ्या आशा तमाम भारतवासीयांना होत्या. मीराबाईदेखील त्याच हिकमतीनं पोडियमवर उतरली होती. जगभरातल्या अव्वल वेटलिफ्टर्सशी स्पर्धा करताना मीराबाईच्या खांद्यांवर तमाम भारतीयांच्या आशांचाही भार होताच. पण त्यातूनही तिनं दमदार कामगिरी केली. पहिल्या स्नॅचमध्ये काहीशा मागे पडलेल्या मीराबाईनं पुढच्या दोन स्नॅचमध्ये कमबॅक केलं. क्लीन अँड जर्कमध्येही मीराबाईची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली. पण पहिल्या स्नॅचमधल्या पिछाडीचा मीराबाई चानूला फटका बसला आणि शेवटी अवघ्या एका किलोच्या फरकानं तिला कांस्यपदकावर पाणी सोडावं लागलं.

रोमेनियाला सुवर्ण, तर थायलंडला कांस्य पदक

चीनच्या कोऊ झिहुईनं २०६ किलोसह सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. तिच्यापाठोपाठ रोमेनियाच्या कॅम्बेई म्लेहेईला व्हॅलेंटिनानं २०५ किलोसह रौप्यपदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठी थायलंडची खम्बाओ सुरोचना आणि मीराबाई चानू यांच्यात कांस्यपदकासाठी चुरस होती. सुरोचनानं एकूण २०० किलो वजन उचलून कांस्यपदकावर दावा केला. पण मीराबाई चानू १९९ किलोपर्यंतच पोहोचू शकली. त्यामुळे तिला चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं.

Vinesh Phogat: “पदक जिंकू शकले नाही हे दुर्दैव पण…” ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया

मीराबाई चानूसाठी सर्वात कठीण ऑलिम्पिक!

यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा मीराबाई चानूसाठी सर्वात कठीण अशी ठरली. पण ती स्पर्धेतील आव्हानांमुळे नसून तिचं वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंबीयांची काळजी यामुळे तिच्यासाठी ही ऑलिम्पिक आव्हानात्मक ठरली. शारिरीक व्याधीशी लढा, कुटुंबीयांपासून बराच काळ लांब राहणं, मणिपूरमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाची काळजी यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक ताणाशी मीराबाई चानूला मोठा लढा द्यावा लागला.

मीराबाई चानू (फोटो – रॉयटर्स संग्रहीत)

पदक जिंकू शकले नाही यासाठी देशवासीयांची माफी मागते – मीराबाई चानू

“मी आजच्या कामगिरीने खूप आनंदी आहे. खेळाडूंना अनेक समस्या असतात हे सगळ्यांना माहिती आहे. दुखापती वगैरे अशा बऱ्याच गोष्टींचा मी सामना करत होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये मला पदकानं हुलकावणी दिली होती. सगळ्याच खेळाडूंबाबत या गोष्टी घडत असतात. त्यानंतर मी वर्ल्ड चॅम्पियन झाले. टोक्यो ऑलिम्पिकमध्येही भारतासाठी रौप्य पदक जिंकलं. यावेळीही Paris Olympic मध्ये सर्वोत्तम कामगिरी करून पदक जिंकण्यासाठी मी प्रयत्न केले. पण आशियाई स्पर्धांदरम्यान मला खूप दुखापतीही झाल्या होत्या. ४ ते ५ महिने रिकव्हरीसाठी गेले. मी आणि माझ्या प्रशिक्षकांनी यावेळी खूप प्रयत्न केले. पुढच्या वेळी मी पदक जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. यावेळी पदक जिंकू शकले नाही यासाठी देशवासीयांची माफी मागते”, अशी प्रतिक्रिया मीराबाई चानूनं पदक निसटल्यानंतर दिली.