Mirabai Chanu Gold Medal In Commonwealth Games 2026: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा इतिहासाला गवसणी घातली आहे. ग्लासगो (स्कॉटलंड) येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ २०२६ स्पर्धेतील वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारातील ४८ किलोग्रॅम वजनी गटात मीराबाई चानूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने १९० किलोग्रॅम वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यासह हे कॉमनवेल्थ स्पर्धेत तिचं सलग तिसरं सुवर्णपदक ठरलं आहे.
मीराबाई चानूचं हे कॉमनवेल्थ स्पर्धेतील सलग तिसरं सुवर्णपदक आहे. याआधी २०१८ आणि २०२२ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही मीराबाई चानूने सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. पण यावेळी मीराबाई चानूला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. तिने स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात ८२ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने ८२ किलो वजन उचलून दमदार पुनरागमन केलं. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात तिने ८५ किलो वजन उचलून कॉमनवेल्थ गेम्समधील नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
क्लीन अँड जर्कमध्ये तिने पहिल्या प्रयत्नात १०५ किलो वजन उचलण्याचं आव्हान ठेवलं होतं. पण तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १०५ किलो वजन उचलताच तिने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. दुसऱ्याच फेरीत तिचं पदक निश्चित झालं होतं, त्यामुळे तिला तिसऱ्यांदा वजन उचलण्याची गरज पडली नाही. याआधी मीराबाई चानूने २०१८ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर कब्जा केला होता. त्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत तिने ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.
भारताचं कॉमनवेल्थ गेम्समधील तिसरं पदक
ग्लासगो येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं आतापर्यंतचं तिसरं पदक आहे. याआधी पुरुषांच्या हेवीवेट पॅरा-पॉवरलिफ्टिंग प्रकारातील १३०.९ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर २८ वर्षीय ऋषिकांत सिंगने ६० किलो वजनीगटात एकूण २६४ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले.
