मिराबाईची रौप्यक्रांती!

मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये शनिवारी ‘रौप्यक्रांती’ घडवली.

ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताची पदककमाई

पीटीआय, टोक्यो

मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये शनिवारी ‘रौप्यक्रांती’ घडवली. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमधील निराशाजनक पदार्पणाचे दु:स्वप्न मागे टाकत चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली.

मिराबाईच्या ऐतिहासिक यशामुळे भारताने ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी पदककमाईचा दुर्मीळ योग साधला. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात उचलले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने मिळवलेले कांस्यपदकसुद्धा ऐतिहासिक होते. जसे ते वेटलिफ्टिंगमधील भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक होते, तसेच भारतीय महिला क्रीडापटूने प्राप्त केलेले पहिले पदक होते.

जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील सुवर्णपदक, दोन राष्ट्रकुल पदके (२०१४-रौप्य, २०१८-सुवर्ण) आणि आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतील कांस्यपदकानंतर अखेर चानूचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकारले.

*चानूने आपले कच्चे दुवे अचूकतेने हेरत स्नॅचमधील पहिल्या प्रयत्नात ८४ किलो वजन उचलले. मग दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलो वजन यशस्वीपणे उचलले. परंतु ८९ किलोचा तिसरा प्रयत्न अपयशी ठरला. या वेळी झिहुईने ९४ किलो वजन उचलत तिच्याहून सरस कामगिरी केली होती.

*त्यानंतर क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये झिहुईने ९६ किलो वजन उचलत निर्विवाद वर्चस्व मिळवले. चानूने पहिल्या दोन प्रयत्नांत अनुक्रमे ११० किलो आणि ११५ किलो वजन उचलले. परंतु अंतिम प्रयत्नात ११७ किलो ती उचलू शकली नाही.

*सुवर्णपदक विजेत्या चीनच्या होऊ झिहुईने एकूण २१० किलो (९४ किलो + ११६ किलो) वजन उचलले. झिहुईने स्नॅच, क्लीन-जर्क आणि एकूण वजन या तिन्हीमधील ऑलिम्पिक विक्रमाची नोंद केली. ‘‘झिहुईला नमवण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु क्लीन अ‍ॅण्ड जर्कमधील अखेरचा प्रयत्न अपयशी ठरला,’’ असे चानूने सांगितले. इंडोनेशियाच्या विंडी कँटिकाने १९४ किलो (८४ किलो + ११० किलो) वजन उचलून कांस्यपदक मिळवले.

मिराबाईची वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्द घडावी, म्हणून पाच वर्षांपूर्वी तिच्या आईने आपले दागिने विकले होते. शनिवारी ऑलिम्पिकमध्ये रुपेरी यश मिळवताना मिराबाईच्या आईचे पाठबळ सहज लक्ष वेधत होती. आईने भेट म्हणून दिलेले ऑलिम्पिकच्या पंचवर्तुळांचे कानातले तिने या वेळी परीधान केले होते. त्यामुळे आई सैखोम ओंगबी टोंबी लेईमाला आपले अश्रू आवरणे कठीण गेले. ‘‘२०१६च्या रिओ ऑलिम्पिकआधी हे कानातले मी मिराबाईला दिले होते. तिला यश मिळावे यासाठी मी ते सोन्याचे बनवले होते. तिने मिळवलेले पदक पाहताना मी आणि माझे पती आनंदाश्रूंत न्हाऊन गेलो. मेहनतीचे चीज झाले,’’ अशी प्रतिक्रिया तिच्या आईने व्यक्त केली.

  • वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकांचे खाते उघडणाऱ्या मिराबाई चानूचे मनापासून अभिनंदन!

– रामनाथ कोविंद,भारताचे राष्ट्रपती

  • ऑलिम्पिकमधील पदक नेहमीच गौरवास्पद असते. मिराबाई तुझी कामगिरी येणाऱ्या कित्येक पिढय़ांना प्रेरणा देईल. रौप्यपदकाबद्दल हार्दिक अभिनंदन!

– अभिनव बिंद्रा, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज

  • ऑलिम्पिकसाठी यापेक्षा अधिक उत्तम सुरुवातीची अपेक्षा मी केली नव्हती. रौप्यपदक मिळवल्याबद्दल मिराबाई तुझे हार्दिक अभिनंदन! मिराबाईच्या यशामुळे देशभरात आनंदाचे वातावरण असून तिच्या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळेल!

– नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

  • अविश्वसनीय! भारतीय नारी, सर्वावर भारी! मिराबाईचे नाव यापुढे सर्वाना लक्षात राहील. सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावल्यामुळे मिराबाई तुला सलाम!

– वीरेंद्र सेहवाग, भारताचा माजी क्रिकेटपटू

  • ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताच्या खात्यात पहिल्या पदकाची नोंद. संपूर्ण भारताला तुझा अभिमान आहे, मिराबाई!

– अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडामंत्री

  • तब्बल २० वर्षांनंतर एखाद्या भारतीय वेटलिफ्टिंगपटूला ऑलिम्पिक पदक जिंकताना पाहण्याचा आनंद निराळाच होता. मिराबाई तुझे या अभुतपूर्व यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. येथून पुढे दिल्ली क्रीडा विद्यापीठामध्ये वेटलिफ्टिंगचासुद्धा समावेश करण्यात येईल.

– कर्णम मल्लेश्वरी, माजी ऑलिम्पिक पदकविजेत्या वेटलिफ्टिंगपटू

चानूने भारताच्या खात्यावरील २९व्या ऑलिम्पिक पदकाची नोंद केली.

कर्णम मल्लेश्वरीने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक आहे.

भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे १८वे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले.

भारतीय महिला क्रीडापटूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक  ठरले.

माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेली पाच वष्रे हे स्वप्न मी जोपासले होते. आज माझा मला अतिशय अभिमान वाटतो. मी सुवर्णपदकाच्या ईष्र्येनेच खेळले. परंतु रौप्यपदकसुद्धा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे यश आहे. ऑलिम्पिकमधील भारतासाठी यंदाचे पहिले पदक मिळवल्याबद्दल मी आनंदित आहे. मी फक्त मणिपूरची नाही, तर संपूर्ण देशाची आहे. मी माझे प्रशिक्षक विजय शर्मा आणि अन्य साहाय्यक मार्गदर्शकांची आभारी आहे. त्यांच्या अथक मेहनत आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळेच हे यश मिळवता आले. मी माझे कुटुंब, विशेषत: आईची आभारी आहे. माझ्या कारकीर्दीतील या सर्वोच्च यशासाठी तिने फार मेहनत घेतली आहे.

मिराबाई चानू

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mirabai silver revolution tokyo olympics 2020 silver medal akp